ठाण्याची मेट्रो पुढे भिवंडी, कल्याण आणि तळोजापर्यंत नेण्याचे एमएमआरडीएने ठरविले आहे. ही बाब खर्चीक असली तरी विकासासाठी मेट्रोचा वेगवान विस्तार आश्वासक आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात दळणवळणाच्या आश्वासक सुविधा उभ्या केल्याशिवाय येथील शहरांमध्ये वेगाने होणाऱ्या नागरीकरणाला अर्थ नाही, हे उशिराने का होईना राज्य सरकारच्या लक्षात येऊ लागले आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या शहरांमधील बांधकाम क्षेत्राला उभारी मिळावी यासाठी सरकारने यापूर्वी विकासकांवर सोयी-सुविधांची अक्षरश: खैरात केल्याचे दिसते. घोडबंदर आणि आसपासच्या परिसरात मुंबईस्थित मोठय़ा बिल्डरांना विशेष नागरी वसाहती उभारण्यासाठी सोयीची धोरणे तसेच वाढीव चटईक्षेत्राचा हिरवा गालिचा यापूर्वीच अंथरला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अगदी पायथ्यापर्यंत गृहसंकुले उभी राहतील अशा पद्धतीने धोरणे आखण्यात आली आहेत. यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ातील शहरांमधील नागरीकरण कमालीच्या वेगाने होईल, अशी चिन्हे आहेत.

नवे ठाणे या नावाने विस्तारणारे घोडबंदर गायमुख खाडीपर्यंत जाऊन पोहोचले आहे, तर दिवा-शीळ-काटई या पट्टय़ात बडय़ा विकासकांची गगनचुंबी संकुले उभी राहत आहे. नागरीकरणाचा हा वेग जबरदस्त असला तरी झपाटय़ाने वाढणाऱ्या या लोकसंख्येला आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधांचे काय या प्रश्नाचे उत्तर मात्र राज्य सरकार आणि स्थानिक प्राधिकरणांकडे नव्हते. मुंबईची गर्दी अटोक्यात आणायची असेल तर ठाणे आणि पलीकडे वसलेल्या शहरांच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यायला हवे याचे भान उशिरा का होईना सरकारला येऊ लागले आहे. म्हणूनच काल-परवापर्यंत मुंबईत स्कॉयवॉक उभारण्यात मग्न असलेल्या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने ठाणे जिल्ह्य़ात विविध नागरी प्रकल्पांची पायाभरणी करण्यात रस दाखविण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या २८ मे २००४ रोजी झालेल्या बैठकीत दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळामार्फत तयार करून घेण्यात आलेल्या मुंबई मेट्रो मार्गाच्या विस्तृत आराखडय़ास मान्यता देण्यात आली. दिल्ली मेट्रो महामंडळाने पहिल्या टप्प्यात मुंबई परिसरात तब्बल नऊ मार्गावर एकूण १४६.५० किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाची आखणी केली होती. यासंबंधीच्या सविस्तर आराखडय़ास मान्यता दिल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्रात अशाच प्रकारे मार्गाची आखणी करण्याचा मुद्दा पुढे आला. ठाणे परिसराचा, विशेषत: घोडबंदर मार्गाच्या परिसराचा, झपाटय़ाने होणारा विकास लक्षात घेता घाटकोपर-मुलुंड हा मेट्रो मार्ग पुढे ठाण्यापर्यंत वाढविण्याचे ठरले. त्यानंतर या मार्गाचा पुन्हा एकदा फेरआढावा घेण्यात आला आणि वडाळा ते घाटकोपर आणि पुढे घाटकोपर ते मुलुंड हे दोन्ही मेट्रो मार्ग रद्द करताना वडाळा ते ठाणे-कासारवडवली अशा मेट्रो मार्गावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यामुळे मुंबई मेट्रो मार्गाची सुधारित लांबी १७२ किलोमीटर एवढी झाली असून यामध्ये भिवंडी ते कल्याण या मुंबई महानगर क्षेत्रात झपाटय़ाने विकसित होत असलेल्या आणखी एका मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई शहराच्या वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध मेट्रो प्रकल्पांची आखणी करत असताना ठाणे, कल्याण, भिवंडी, नवी मुंबई या शहरांना एकमेकांशी मेट्रोने जोडण्यासाठी एमएमआरडीएने वेगाने आखणी सुरू केली हे एका अर्थाने बरेच झाले. खरे तर या सगळ्या शहरांच्या लोकसंख्येने कमाल मर्यादा केव्हाच ओलांडण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईत खारघर पट्टय़ात सिडकोने त्या भागातील उपनगरांच्या उभारणीसोबत मेट्रोचे कामदेखील सुरू केले. ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये एमएमआरडीएने सिडकोचा हा कित्ता गिरवायला हवा होता, मात्र तसे झालेले नाही. एकटय़ा घोडबंदर परिसराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत पाच लाखांच्या पलीकडे पोहोचली आहे. या भागातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने झेपावणारे प्रवाशांचे लोंढे पाहता या ठिकाणी किमान दशकभरापूर्वीच मेट्रोचे काम सुरू व्हायला हवे होते. सकाळ-सायंकाळी गर्दीच्या वेळेत घोडबंदर मार्गावर खासगी वाहनांची तुफान गर्दी होऊ लागली आहे. याशिवाय नाशिक आणि अहमदाबाद महामार्गाच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांनी हा मार्ग व्यापून टाकला आहे. या मार्गाच्या आसपास बडय़ा बिल्डरांच्या गृहप्रकल्पांना वाढीव चटईक्षेत्राचे इंधन पुरविण्याची लगबग महापालिका वर्तुळात सतत सुरू असते. त्यामुळे पुढील काळात या ठिकाणची लोकसंख्या विक्रमी आकडे गाठणार आहे. या पाश्र्वभूमीवर गायमुखपर्यंत मेट्रो मार्ग विस्तारण्याचा निर्णय एमएमआरडीएने उशिरा का होईना घेतला हे ठाणेकरांच्या दृष्टीने बरेच झाले. हाच मार्ग पुढे दहिसर-मीरा-भाईंदर या शहरांशी जोडता येणार आहे. ठाण्याची मेट्रो पुढे भिवंडी, कल्याण आणि तळोजापर्यंत नेण्याचे एमएमआरडीएने ठरविले आहे. कागदावरील ही योजना अतिशय खर्चीक असली तरी या प्रकल्पांची कामे नजीकच्या काळात सुरू होतील, अशी चिन्हे आहेत.

जयेश सामंत jayesh.samant@expressindia.com