लहान गावांतील रस्त्यांसाठी ५० लाख, मोठय़ा गावांसाठी दोन कोटींचा निधी
ठाणे आणि भिवंडी दरम्यान विविध माध्यमातून पर्यटन केंद्र विकसीत करू पाहणाऱ्या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने भिवंडी तालुक्यातील रस्त्यांच्या उभारणीसाठी सुमारे १६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित येणाऱ्या या भागातील लहान गावांमधील रस्त्यांसाठी सुमारे ५० लाख तर मोठय़ा गावांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी प्राधिकरणाने मंजूर केला आहे. या मार्गावरील कोन, पिंपळास, वेहेळे, मानकोली, अंजूर, अलिमघर, खाडीपार ते जिल्हा मार्ग असे प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार असून भिवंडी-कल्याण हा प्रवासही यामुळे सुखकर होणार आहे.
एमएमआरडीएने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात भिवंडी, खारबाव, पायबाव पट्टय़ात साहसी क्रीडा केंद्र, अभयारण्य विकसीत केले जाणार आहे. याशिवाय याच भागात ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक हबचा विकासही केला जाणार आहे. या मोठय़ा प्रकल्पांचा विकास करत असताना एमएमआरडीएने याच भागातील गावांमधील रस्त्यांच्या विकासासाठी १६८ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या परिसरातील ५५ गावांमध्ये विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची यापुर्वीच नियूक्ती करण्यात आली आहे. असे असले तरी गेल्या अनेक वर्षांत येथील विकासाकडे ढुंकूनही पाहिले जात नसल्याची ओरड सातत्याने केली जात होती. अखेर मुंबई, ठाण्याच्या पलिकडे असलेल्या शहरांचा विकासासाठी भरीव निधीची तरतूद केली जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे. भिवंडी तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांसाठी ४४ कोटी ५५ लाख, इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यासाठी ३३ कोटी ५४ लाख २५ हजार, गावातील बाह्य़ रस्त्यांसाठी ९० कोटी १२ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती या भागातील खासदार कपील पाटील यांनी पत्रकारांना दिली. या निधीमधून तब्बल २२१ किलोमीटर रस्त्यांची कामे होतील. ठाणे-कल्याणजवळ असलेल्या अनेक गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे काही रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. या निधीतून नव्या रस्त्यांची बांधणी होणार असल्याने या भागातील रहिवाशांना दिलासा मिळेल, असा दावाही पाटील यांनी केला.