‘एमएमआरडीए’च्या ‘२०१६ ते २०३६ भविष्यवेध’मध्ये गृहप्रकल्पांची घोषणा

कल्याण – ठाणे, रायगड जिल्ह्य़ातील कर्जत, पनवेल, ठाणे, भिवंडी, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये येत्या २० वर्षांत तब्बल ५० लाख घरे बांधण्याचा संकल्प मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने सोडला आहे. ‘एमएमआरडीए’च्या २०१६ ते २०३६ या ‘भविष्यवेध’ प्रकल्पात या गृह प्रकल्प उभारणी प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

नैसर्गिक वाढ गृहीत धरून ठाणे पालिकेची लोकसंख्या येत्या पंधरा वर्षांत सुमारे ३० लाख, कल्याण-डोंबिवली २४ लाख, वसई-विरार पट्टा २९ लाख, मीरा-भाईंदर १७ लाख तर कल्याण-डोंबिवलीजवळील २७ गावांची लोकसंख्या चार लाखांहून अधिक असणार आहे. नागरीकरणामुळे या भागातील उद्योग-व्यवसायात, नोकरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांची घरांची गरज ओळखून या गृहप्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे. या घरांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्राधीकरणाला दर वर्षी दीड लाख नवीन घरे उभारावी लागणार आहेत. दर वर्षीचे हे लक्ष्य पूर्ण झाले तर येत्या वीस वर्षांत ५० लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे, असे ‘भविष्यवेध’(व्हिजन डॉक्युमेंट) अहवालात म्हटले आहे.

प्राधीकरणाची निवासी संकुलांची आरक्षणे, बेघरांसाठी घरे आरक्षणे तसेच इतर सरकारी जमिनी, झोपडय़ांच्या जागांवर हे गृहप्रकल्प आकाराला येऊ शकतील, असा दावा करण्यात आला आहे. शहरांमधील सत्तर हजार झोपडय़ा तोडून तेथे नवीन घरांची योजना राबविण्यात येणार आहे. ठाणे, रायगड जिल्ह्य़ात आरक्षित भूखंडावर उभ्या राहिलेल्या बांधकामांमधून सुमारे बारा हजार सदनिका उपलब्ध होण्याची शक्यता आहे. विभागवार अशा पद्धतीने गृहप्रकल्प, सदनिका ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. प्राधीकरण हद्दीत यापूर्वी उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पांमधील सुमारे साडेसात लाख सदनिका विक्री न झाल्याने बंद पडून आहेत. यामधील सुमारे तीन लाख सदनिका भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिल्या तर भाडय़ाच्या माध्यमातून महसूल उपलब्ध होईल. गृहप्रकल्प खर्चातील पन्नास टक्के खर्च या निधीतून उभा करणे शक्य होणार आहे. तसेच काही ठिकाणी सदनिका व्यापारी वापरासाठी उपलब्ध करून देण्याची योजना या अहवालात मांडण्यात आली आहे.

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू आहे. या निर्णयामुळे प्राधीकरण क्षेत्रात येत्या काही वर्षांत सुमारे २ लाख ३६ हजार सदनिका निवासासाठी उपलब्ध होणार आहेत. नवीन गृहप्रकल्पातील घरे खुली केली तसेच व्यापारी वापर, अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण आणि त्याचबरोबर नवीन नियोजनाप्रमाणे गृहप्रकल्पांची उभारणी झाली तर येत्या वीस वर्षांत पन्नास लाख घरांचे लक्ष्य पूर्ण करणे शक्य होणार आहे, असे अहवालात म्हटले आहे.

निविदा प्रक्रिया सुरू

बारावे, खोणी आणि शिरढोण या गावांच्या हद्दीत ‘अल्प उत्पन्न गट’ आणि ‘आर्थिक दुर्बल घटकां’मधील रहिवाशांसाठी २६ हजार १९२ सदनिका बांधण्याचा निर्णय ‘कोकण म्हाडा’ने घेतला आहे. कंत्राटदारांकडून निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. २२२८ कोटी खर्च या गृहनिर्माण प्रकल्पांच्या उभारणीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. या तीन गृहप्रकल्पांत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी एकूण २१ हजार ५९२ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी ४ हजार ६०० सदनिका बांधण्यात येणार आहेत, असे कोकण हाऊसिंग बोर्डाच्या सूत्राने सांगितले.