माणकोली खाडीपूल
मुंबई-ठाणे मार्गावर प्रवाशांसाठी दळणवळणाचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी करण्याचे बेत आखले जात असतानाच ठाणे आणि डोंबिवली हे अंतर अध्र्या तासात कापता यावे यासाठी माणकोली मोठागाव रस्त्यावर उल्हास खाडीवर सहा पदरी उड्डाण पूल उभारण्याच्या प्रकल्पास अखेर मान्यता देण्यात आली आहे. मुंबई-नाशिक महामार्गाने ठाणे-डोंबिवली हा प्रस्ताव कटकटीचा आणि वेळेचा अपव्यय करणारा मानला जातो. त्यामुळे मुंब्रा बायपास अथवा महापे-शीळमार्गे कल्याण रस्त्यावरून ठाणे-डोंबिवली प्रवास केला जातो. गेल्या काही वर्षांत कल्याण शीळ मार्गावर वाहनांची संख्या तिपटीने वाढली आहे. त्यामुळे हा प्रवासही कोंडीचा होऊ लागला आहे. त्यामुळे उल्हास खाडीवर उड्डाण पूल उभारून ठाणे-डोंबिवली हे अंतर अध्र्या तासावर आणावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता दिली. त्यानंतर मात्र हा प्रकल्प केवळ कागदावर राहतो की काय असे चित्र निर्माण झाले होते. एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत या उड्डाणपुलाच्या निविदेस अखेर मान्यता देण्यात आली आहे. २४५ कोटी रुपये खर्च करून खाडीवर सहा पदरी उड्डाण पुलाची उभारणी केली जाणार असून सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीस हे काम देण्यात आले आहे. पुढील पाच वर्षांत हा उड्डाण पूल बांधून पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदारास देण्यात आले आहेत.

भिवंडी-कल्याण उड्डाण पूल
भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीवर उतारा शोधण्यासाठी उड्डाण पुलांची उभारणी केल्यानंतर एमएमआरडीएने भिवंडी-कल्याण-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर उल्हास खाडीवर उड्डाण पूल उभारण्याचे निश्चित केले आहे. उल्हास खाडीवर दुर्गाडी किल्ल्याजवळ उभारण्यात येणाऱ्या या पुलामुळे या भागातील वाहतूक अधिक वेगवान होऊ शकणार आहे. या उड्डाण पुलाच्या सुमारे ७५ कोटी रुपयांच्या निविदेस नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. भिवंडी-कल्याण ही दोन शहरे जवळ आणण्यासाठी याच मार्गावर नव्या उड्डाण पुलांच्या उभारणीचा प्रस्तावही आखण्यात आला आहे. भिवंडी शहरात रेल्वेची लोकल वाहतूक नसल्याने या शहरातील नागरिकांना मुंबई गाठण्यासाठी कल्याणच्या दिशेने यावे लागते. त्यामुळे भिवंडी-कल्याण हा प्रवास या भागातील रहिवाशांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे भिवंडी-कल्याण मार्गावर प्रमुख जंक्शनवर उड्डाण पूल उभारणीस मान्यता देण्यात आली आहे.

साहसी क्रीडा केंद्र, अभयारण्य
ठाण्याच्या लगतच एखादे पर्यटन केंद्र उभे राहावे यासाठी भिवंडी शहरालगत खारबाव भागात सहासी क्रीडा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएने यंदाच्या अर्थसंकल्पात नमूद केला आहे. याच भागात गोदामांची मोठी संख्या लक्षात घेता लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असून हा परिसर वाहतूक केंद्र म्हणून विकसित करण्याचाही प्रस्ताव आहे. खारबावलगत असलेल्या कामन पट्टय़ात तुंगारेश्वरच्या धर्तीवर अभयारण्य उभारण्याचे प्रस्तावित आहे. या संपूर्ण प्रदेशाला मोठा समुद्र तसेच खाडी किनारा लाभला आहे. हा खाडी किनाऱ्याचे जतन करण्याचा प्रयत्न केला जाणार असून याशिवाय जलाशये, हरित पट्टय़ाचे संवर्धन करण्यासाठी विवीध योजनांची आखणी करण्याचा मनोदय एमएमआरडीएच्या प्रारूप विकास आराखडय़ात व्यक्त करण्यात आला आहे. माथेरान डोंगराजवळ तसेच भिवंडी परिसरात खारबाव, गणेश घाट भागात तीन प्रादेशिक उद्यानांच्या उभारणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यापैकी कामण पट्टय़ातील अभयारण्य ठाण्याच्या वेशीवरील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडता येईल का, याचीही चाचपणी केली जाणार आहे.