भिवंडी-कल्याण मार्गिकेत धामणकरनाका पुलाचा अडसर; पूल पाडल्यास भिवंडीत वाहतूक कोंडी वाढण्याची भीती

किशोर कोकणे लोकसत्ता

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) उभारण्यात येत असलेल्या ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्पाच्या कामात भिवंडीतील वाहतुकीची धमनी समजला जाणाऱ्या धामणकर नाका उड्डाणपुलाचा अडसर निर्माण झाला आहे. हा पूल पाडल्याखेरीज मेट्रोचे काम पुढे नेणे शक्य नसल्याचा निष्कर्ष प्राधिकरणाने काढला आहे. मात्र, पूल पाडल्यास भिवंडी शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

धामणकरनाका भागात अनेक सरकारी कार्यालये, सरकारी रुग्णालय आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल पाडला गेल्यास भिवंडी शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडणार आहे. त्याचा परिणाम मुंबई नाशिक महामार्गावर बसून भिवंडी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रस्तावावर नेमका कोणता मार्ग काढायचा असा प्रश्न महापालिका आणि वाहतूक पोलिसांपुढे आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीचे काम सध्या वेगात सुरू आहे. या प्रकल्पात ठाण्यातील कापूरबावडी ते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत एकूण १७ स्थानके आहेत. या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्याचे काम कापूरबावडी ते भिवंडीपर्यंत करण्यात येत असून कापूरबावडी, बाळकूम आणि काल्हेर भागात या कामाची सुरुवात झाली आहे. भिवंडी शहरात मोठय़ा प्रमाणात गोदामे आणि कारखाने असल्याने देशभरातून दिवसाला शेकडो मालवाहतूकदार येथील गोदामांमध्ये साहित्य घेऊन ये-जा करत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका होऊ बसू नये म्हणून कार, दुचाकी तसेच इतर हलक्या वाहनांना धामणकरनाका उड्डाणपुलावरून सोडले जाते. इतर अवजड वाहने उड्डाणपुलाखालून जातात. या उड्डाणपुलामुळे भिवंडीतील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळत आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल भिवंडीतील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मेट्रोच्या निर्माणामध्ये आता धामणकरनाका उड्डाणपुलाचा अडथळा उभा राहात असल्याने महानगर प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यामुळे धामणकरनाका उड्डाणपूल पाडण्याचे प्रस्तावित असल्याचे एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. हा उड्डाणपूल पाडल्यास त्याचा फटका भिवंडीतील संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर पडणार आहे. भिवंडी शहरातील रस्ते निमुळते आहेत. तसेच धामणकरनाका परिसरात सरकारी रुग्णालय, भिवंडी न्यायालय, भिवंडी महापालिका, एसटी बस थांबा यासह अनेक महत्त्वाची खासगी कार्यालये आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या अनेकांचे यामुळे हाल होणार आहेत. तर येथील वाहतूक कोंडीचा भार मुंबई नाशिक महामार्गावर येणार आहे. हा उड्डाणपूल पाडून त्याजागी नवा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे आणि त्यावरून मेट्रोची मार्गिका काढण्यात येणार आहे, अशी माहिती प्राधिकरणातील सूत्रांनी दिली. हे काम करताना वाहतूक व्यवस्था कोलमडू नये असे प्रयत्न केले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले.