रोजच्या कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा; ३० मीटरचा रस्ता ६० मीटर करणार;
रुंदीकरणासाठी एमएमआरडीएची ७७ कोटींची निविदा
उरणच्या जवाहरलाल  नेहरू बंदरातून भिवंडीच्या दिशेने दररोज निघणाऱ्या शेकडो अवजड वाहनांमुळे कोंडीच्या गर्तेत सापडलेल्या कल्याण, शीळ, मुंब्रा, नवी मुंबई परिसरास मोकळा श्वास घेता यावा यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने या भागात उड्डाणपुलांच्या उभारणीसोबत रस्ता रुंदीकरणाचाही प्रकल्प आखला आहे. कल्याण-नवी मुंबईला जोडणाऱ्या शिळफाटा चौकातून पुढे डायघर पोलीस ठाण्यालगत असलेल्या शिळ गावाच्या दिशेने जाणाऱ्या सद्य:स्थितीतील जेमतेम ३० मीटर रुंदीच्या रस्त्याचे ६० मीटरपर्यत रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महानगर विकास प्राधिकरणाने ७७ कोटी ९४ लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात शिळफाटय़ावरील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघणे शक्य होणार आहे.

कल्याण-ठाणे-नवी मुंबई या त्रिकोणात गेल्या काही वर्षांपासून झपाटय़ाने नागरीकरण होत असून मुंबईतील काही बडय़ा विकासकांच्या विशेष नागरी वसाहतींची उभारणीही या भागात केली जात आहे. ठाणे, भिवंडी शहराच्या आसपास विविध रस्त्यांच्या रुंदीकरणाचे तसेच उड्डाणपूलांच्या उभारणीचे प्रकल्प उभे राहत असताना गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगर विकास प्राधिकरण तसेच रस्ते विकास महामंडळाने शिळफाटा, कल्याण, महापे या मार्गावरील कोंडीमुक्त प्रवासासाठी विविध प्रकल्पांची आखणी सुरू केली आहे. कल्याण, डोंबिवली ते नवी मुंबई असा प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे शिळफाटा ते कल्याण या मार्गावर उन्नत मार्गाची उभारणी करण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम राज्य सरकारने रस्ते विकास महामंडळाकडे सोपविले आहे. मुंब्रा बाह्य़ वळण रस्त्यापासून शिळफाटा मार्गावर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने उड्डाणपुलांची आखणी केली आहे, तर महापे-शिळ मार्गावरही अशाच पद्धतीचे रुंदीकरण आणि उड्डाणपूल उभारणीची कामे सुरू आहेत. असे असले तरी उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरातून निघणाऱ्या अवजड वाहनांनी मात्र या संपूर्ण परिक्षेत्राच्या वाहतुकीचे गणित मोडकळीस आणले आहे. त्यावर उपाय म्हणून शिळफाटा ते शिळ जंक्शनपर्यंतच्या तीन किलोमीटर अंतराचे रुंदीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मोहन पाटील यांनी दिली.

प्रकल्प काय?

’अवजड वाहनांची संख्या लगतच्या काळात मोठय़ा प्रमाणावर वाढल्यामुळे शिळफाटा परिसराचा संपूर्ण पट्टा कोंडीचे आगार बनला आहे. त्यामुळे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने मुंब्रा बाह्य वळणरस्त्यापासून शिळफाटय़ापर्यत उड्डाणपुलांची आखणी केली आहे.

’  हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित केला असून महापालिकेच्या विकास आराखडय़ात तो ६० मीटर रुंदीचा आहे. सद्य:स्थितीत या रस्त्याची रुंदी ३० मीटर इतकीच आहे.

’ या भागात उड्डाणपुलाच्या उभारणीत उच्च वीज वाहिन्यांचा अडसर येत असल्याने शिळ जंक्शन ते शिळफाटा पुलाचा प्रकल्प तूर्तास एमएमआरडीएने मागे ठेवला आहे.

’ हे करत असताना या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे दुप्पच रुंदीकरण करून अवजड वाहतुकीस वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता मोहन पाटील यांनी दिली.

’ या कामाच्या निविदा मागविण्यात आल्या असून अडीच वर्षांच्या कालावधीत ते पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले आहे.