|| जयेश सामंत/ नीलेश पानमंद

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एमएमआरडीए, रस्ते विकास महामंडळाकडे मागणी करणार

ठाणे : तीन हात नाका येथील कोंडी सोडविण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून आखण्यात आलेला वाहतूक सुधारणा प्रकल्प लाल बहादुर शास्त्री मार्गावरून येणारी मेट्रोची मार्गिका आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीच्या अडथळ्यामुळे बारगळला आहे. ठाणे महापालिकेने आता यावर उपाय शोधण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि राज्य रस्ते विकास महामंडळाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरी पुलाचे काम पूर्ण होताच पूर्व द्रुतगती महामार्गावर कोंडीचे दुखणे कमी होण्याची चिन्हे असली तरी तीन हात नाका येथे कोंडीचे नवे केंद्र उभे राहील, अशी भीती आहे. त्यावर उपाय शोधण्यासाठी राज्य सरकारची मदत घेण्याची तयारी सुरू आहे.

शहरातील सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेल्या पूर्व दु्रतगती महामार्गावरील तीन हात नाका परिसरातील उड्डाणपुलावर आणखी एका उड्डाणपुलाची (ग्रेड सेपरेटर) उभारणी करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी तयार केला होता. या संपूर्ण भागातील वाहतूक सुधारणा प्रकल्पाची आखणी कशी असावी यासाठी सल्लागार नेमण्यात आला तसेच आराखडाही तयार केला गेला. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून हे काम हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा प्रस्ताव तयार करण्यात आला. हा सगळा खटाटोप करत असताना मेट्रो मार्गिका आणि मुंबई महापालिकेची जलवाहिनी या अडथळा ठरतीलहा विचारही केला गेला नाही. आता मात्र या अडथळ्यांमुळे हा प्रकल्प धोक्यात आला आहे. आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी या अडचणी विचारात घेता स्मार्ट सिटी योजनेतून या प्रकल्पाचा वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

कोंडी सोडवायची कशी?

ठाणे शहरातून जाणाऱ्या पूर्व दु्रतगती महामार्गावरील तीन हात नाका, नितीन कंपनी आणि माजिवडा येथील चौकांत उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली आहे. या चौकांना शहराच्या अत्ांर्गत भागात जाणारे मार्ग जोडण्यात आले आहेत. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. तर ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणारे रस्ते तीन हात नाका चौकाला जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे या चौकामध्ये वाहनांची सर्वाधिक वर्दळ असते आणि यातूनच या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलावर आणखी एका उड्डाणपुलाची उभारणी करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी तयार केला होता. या पुलाच्या मार्गिका लालबहादूर शास्त्री मार्गावर इटर्निटी मॉल ते मुलुंड चेकनाका आणि ठाणे शहरात हरिनिवास चौकापर्यंत करण्यात येणार होत्या. तसेच नितीन कंपनी चौकातील उड्डाणपुलापर्यंत विस्तारित मार्गिका करण्यात येणार होती. मात्र, या परिसरातच मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या मेट्रो मार्गिकेमुळे आता ग्रेड सेपरेटर प्रकल्पाची उभारणी करणे शक्य होणार नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे प्रशासनाने भुयारी मार्गाची चाचपणी सुरू केली होती. परंतु मुंबई महापालिकेची जलवाहिनी या भागातील जमिनीखालून गेली असून यामुळे भुयारी मार्गाची उभारणीही करणे शक्य नसल्याचे समोर आले आहे. यामुळे या भागातील कोंडी सोडवायची तरी कशी असा मोठा पेच प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. यातूनच राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एमएमआरडीएची मदत घेण्याचा विचार सुरू आहे.

तीन हात नाका भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ग्रेड सेपरेटर प्रकल्प राबविण्यात येणार होता. परंतु या भागातून जाणाऱ्या मेट्रो मार्गिकेमुळे हा प्रकल्प राबविणे शक्य नाही. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीमुळे याठिकाणी भुयारी मार्गही करणे शक्य नाही. यामुळे या भागाचा सविस्तर अभ्यास करून इथे आता कोणता प्रकल्प राबवून कोंडी सोडविता येऊ शकते, याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एमएमआरडीएकडे करण्यात येणार आहे. – डॉ. विपीन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका