मनसेचा आंदोलनाचा इशारा

दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाटय़ा अनिवार्य असताना आता वसईत काही ठिकाणी गुजराती पाटय़ा दिसू लागल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही दुकाने वसईत असून त्यावर गुजरात राज्यातील पत्ता लिहिण्यात आला आहे. मनसेने या प्रकरणी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ८ हा वसईतून जातो. या महामार्गाच्या दुतर्फा अनेक उपाहारगृहे, औद्य्ोगिक कंपन्या आणि दुकाने आहेत. यातील काही दुकानांवर गुजराती भाषेत पाटय़ा लिहिल्या असल्याचे आढळून आले आहे. वसई पूर्व भागातील काही ठिकाणी अशा गुजराती पाटय़ा असून त्यावर गुजरात राज्यातील पत्ता लिहिलेला आहे. वसई पूर्व येथील गोखिवरे भोईदापाडा सातिवली रोडवरील राजप्रभा इंडस्ट्रियल इस्टेट शॉप क्रमांक चार बिल्डिंग क्रमांक एक या पत्त्यावर महाराष्ट्रऐवजी गुजरात ३८४३४० असा स्पष्ट उल्लेख आहे तर, नालासोपारा पूर्वेकडील एक पत्त्यावर ४०१ २०९ नालासोपारा पूर्व वसई, गुजरात असा स्पष्ट उल्लेख आहे.

मनसेचे वसई ग्रामीण तालुका अध्यक्ष जयेंद्र पाटील यांनी या प्रकाराला आक्षेप घेतला आहे. वसईतील व्यावसायिक गुजरातमधील पत्ता दुकानांवरील पाटय़ांवर का लिहीत आहेत, हे कळायला मार्ग नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत आम्ही प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. याच वेळी आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात मराठी पाटय़ा लावण्याचा कायदा आहे. परंतु महापालिका प्रशासन, महसूल विभाग हे गुजराती पाटय़ांवरचे अतिक्रमण रोखण्यात असमर्थ ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.