महापालिकेच्याच मालकीच्या ‘ठाणे क्लब’मध्ये मनमानी पद्धतीनं शुल्क आकारून नागरिकांची लूट करणाऱ्या ठेकेदाराचे बिंग ‘लोकसत्ता’ने फोडल्यानंतर याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटू लागले आहेत. या ठेकेदाराची निविदा तात्काळ रद्द करा, अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना घेराव घातला. यावेळी ‘दोषी आढळल्यास ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल’ असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले.
ठेकेदाराच्या वरकमाईमुळे वादग्रस्त ठरलेल्या ‘ठाणे क्लब’च्या मुद्दय़ावरून गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कँाग्रेस आणि राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. विरोधकांच्या आक्रमणामुळे सत्ताधारी शिवसेनेला गुरुवारची सभाच गुंडाळावी लागली. मात्र, आता सभागृहाबाहेरही विरोधकांनी शिवसेनेला घेरण्यास सुरुवात केली आहे. ‘ठाणे क्लब’च्या ठेकेदाराची नियुक्तीच नियमबाह्य असल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयात शिरून आयुक्तांना त्यांच्या कार्यालयातच घेराव घातला.  यावेळी ठाणे क्लबच्या ठेकेदाराकडून सुरू असलेल्या वरकमाईचा निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मुख्यालयाचे सुरक्षाकडे भेदण्यात आल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र, नंतर मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे ‘ठाणे क्लब’बाबत निवेदन सादर केले. ठाणेकरांची लूट करणाऱ्या या ठेकेदाराची निविदा तात्काळ रद्द करावी आणि नवीन निविदा प्रकिया करून हा क्लब ठाणेकरांसाठी खुला करावा, अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. दरम्यान, ठाणे क्लबच्या ठेकेदारासोबत केलेल्या कराराची कागदपत्रे तपासतो आणि त्यामध्ये ठेकेदार दोषी असेल तर त्याची निविदा तात्काळ रद्द करण्यात येईल, असे आश्वासन जयस्वाल यांनी दिल्याची माहिती मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

..तर ठाणेकरांसाठी क्लब खुला करू
ठाणेकरांची लूट करू पाहाणाऱ्या ठाणे क्लबच्या ठेकेदारावर महापालिकेने कारवाई केली नाही आणि आयुक्तांनी त्यांचे आश्वासन पाळले नाही तर हा क्लब ठाणेकरांसाठी खुला करून दिला जाईल. ठाणे शहरातील नागरिकांना या क्लबमधील तरणतलाव मोफत पोहण्याकरिता मनसेतर्फे उपलब्ध करून देण्यात येईल, असा इशाराही जाधव यांनी यावेळी दिला.