दहीहंडीच्या उत्सवावर न्यायालयाने लादलेले निर्बंध धुडकावून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाण्यात ४० फुटी दहीहंडी उभारली आहे. या दहीहंडीला ‘कायदेभंग दहीहंडी’ असे नाव देऊन मनसेने न्यायालयाच्या निर्णयाला पुन्हा एकदा जाहीरपणे आव्हान दिले आहे. त्यामुळे पोलीस आता याबाबत काय कारवाई करणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. सध्या या दहीहंडीच्याठिकाणी गणवेशातील आणि साध्या वेषातील पोलीस बंदोबस्त तैनात आहे. तसेच पोलिसांकडून वेळ पडल्यास न्यायालयात पुरावा सादर करण्यासाठी या दहीहंडीच्या ठिकाणाची व्हिडिओग्राफी केली जात आहे. ठाण्यातील नौपाडा येथे मनसेकडून ही ‘कायदेभंग’ दहीहंडी उभारण्यात आली असून या हंडीसाठी ११ लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. साहसी खेळ संपू नयेत यासाठी आम्हाला हा कायदेभंग करावा लागत असल्याची प्रतिक्रिया दहीडंडीच्या आयोजकांनी व्यक्त केली. आमच्याकडे आत्तापर्यंत २०३ मंडळांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे न्यायालयाने जनमताचा कौल ओळखावा, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे. दरम्यान, दहीहंडीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून २० फुटांच्या उंचीची घालून देण्यात आलेल्या मर्यादेचे गोविंदा मंडळांकडून उल्लंघन होण्याचीच शक्यता जास्त आहे. डोंबिवलीतही काहीवेळापूर्वीच दहीहंडी फोडण्यासाठी एका मंडळाकडून पाच थर रचून या कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन करण्यात आले.
दहीहंडीची उंची २० फूट असावी आणि थरामध्ये १८ वर्षांखालील मुलांचा सहभाग नसावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. उच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने कायम केले आहेत. त्यामुळे गेला महिनाभर गोविंदा पथकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. तसेच पथकांचा थर रचण्याचा सरावही थंडावला होता. नियमानुसार चार थर रचायचे की क्षमतेनुसार उंचात उंच थर रचून दहीहंडी फोडायची याबाबत पथकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. जोगेश्वरीच्या ‘जय जवान गोविंदा पथका’ने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर पथकांच्या पदरात निराशा पडली. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मुंबईतील गोविंदा पथकांची गुप्त बैठक झाली. या बैठकीनंतर दहीहंडी आणि थरांविषयी सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला. गोपाळकाला धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्धार मुंबईमधील समस्त गोविंदा पथकांनी केला आहे. त्याला आयोजकांचीही छुपी साथ आहे.