१२ आश्वासनांपैकी केवळ पाच पूर्ण
‘‘इतरांसारखी भारंभार आश्वासने देऊन तुम्हाला फसविण्यापेक्षा मोजकीच आश्वासने देतो आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहीन’’, असे आश्वासन मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पाच वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत जनतेला दिले होते. मोजकीच विकासकामांची १२ आश्वासने मनसेने जनतेला दिली होती. त्यामधील सुसज्ज ग्रंथालय उभारणीचे आश्वासन पूर्ण केले. उर्वरित पाच विषयांवर मनसेचे नगरसेवक विरोधी बाकांवरून सर्वसाधारण सभेत वेळोवेळी आवाज उठवत होते. त्यांचा आवाज सत्तेपर्यंत न पोहचल्याने आणि काही विषयांवर मनसे नगरसेवकांनी कचखाऊ भूमिका घेतल्याने शहर विकासाचे प्रश्न सोडविण्यात हा पक्षही मागे राहिला. वचकनाम्यातील बहुतांशी आश्वासने कागदावरच राहिली.
‘‘सत्ता नसली तरी विरोधी बाकावर बसून माझे नगरसेवक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावतील. माझ्या नगरसेवकांवर वचक ठेवण्यासाठी दर पंधरा दिवसांनी मी या शहरात येईन’’, हे जनतेला दिलेले आश्वासन राज ठाकरे यांनी पाळले असते तर, प्रभावी, प्रबळ असा विरोधी पक्ष म्हणून मनसेचा चेहरा जनतेसमोर गेला असता. आक्रमक विरोधामुळे सत्ताधाऱ्यांना काही विकासकामे करणे भाग पडले असते. निव्वळ गटारे, पायवाटा, पथदिवे, व्यायामशाळा, फेरीवाले, हळदीकुंकू, मंगळागौर, शिलाई मशीन आणि शेवटी बेकायदा चाळी या विषयांमध्ये इतर पक्षांतील नगरसेवकांप्रमाणे मनसेचे नगरसेवक, नगरसेविका जसे अडकले. ते अडकण्याचे प्रमाण काही प्रमाणात घटले असते. राज ठाकरे शहरात आले पण ते फक्त एका जवाहिऱ्याचे दुकाने उद्घाटनासाठी आणि विकासकांना भेडसावणाऱ्या जीना अधीमूल्य कमी करून घेण्याच्या कामासाठी. हीच धाव राज यांनी जनतेच्या कामासाठी अधिक घेतली असती तर आता मनसेला आम्ही जिवंत आहोत हे दाखविण्यासाठी धावाधाव करावी लागली नसते.
साडेचार वर्ष मनसेकडे विरोधी पक्षनेते पद होते. २७ नगरसेवकांचा एक अखंड गट सभागृहात कार्यरत होता. सुशिक्षित नगरसेवक मनसेत सर्वाधिक असल्याने या मंडळींकडून शहर विकासाबरोबर नेहमीच सत्तेत राहून ‘ओरबाडू’ भूमिका ठेवणाऱ्या शिवसेना-भाजपवर वचक बसेल, असे वातावरण सुरुवातीला होते. नंतर दिवस मागे पडत गेले तसे मनसेचे नगरसेवक, पदाधिकारी हे महापौर, स्थायी समिती सभापतींच्या अंतर्गत दालनात अधिक दिसू लागले. मनसे नगरसेवकांचे ‘पाणी’ सत्ताधाऱ्यांनी जोखल्याने सभागृहात अनेक विषयांवर मनसे तोंडघशी पडली. टिटवाळ्यातील एका बेकायदा बंगल्याच्या प्रकरणात मनसेच्या नगरसेवकाने जोरकस भूमिका मांडली. पण मनसेवर सेटिंगचा आरोप होताच वारे उलटे वाहू लागले. या प्रकरणाची सर्वसाधारण सभेत चौकशी वगैरे करण्याच्या घोषणा झाल्या. त्यानंतर हवेत विरल्या.

वचकनाम्यातील आश्वासने
’शहरातील रस्ते सीमेंटचे करणार. या रस्त्यांवर एकही खड्डा पडणार नाही याची दक्षता घेणार
’नवीन बांधकामांना पर्जन्य जलसंचय सक्तीचे.
’कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प.
’खाडी किनारा भागात नाशिकच्या गोदा पार्कसारखा विकास.
’पालिका रुग्णालयांची दुरवस्था दूर करणार
’झोपडीतील बकालपण रोखण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम
’शहराच्या चारही बाजूने झाडे लावून वनराई वाढविणार
’अतिक्रमणे रोखण्यासाठी प्रयत्न करणार
’परिवहन व्यवस्थेत सुधारणा करणार
’बोगस शिधापत्रिका, वाहन परवान्यांची पालिकेतर्फे पाहणी केली जाईल

काय केले?
’डोंबिवलीतील टिळक रस्ता येथे सुसज्ज आचार्य ग्रंथालय उभारण्यासाठी पाठपुरावा केला.
’सीमेंट रस्त्यांमधील फोलपणा उघड केला
’प्रभागांमधील गटारे, पदपथ, मलनि:स्सारण सुविधा देण्यासाठी मनसे नगरसेवकांनी प्रभागाप्रमाणे प्रयत्न केले
’ पालिका रुग्णालयांची दुरवस्था कमी करून तेथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात म्हणून वेळोवेळी शासनाकडे पत्रव्यवहार केला.