कल्याणमधील दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना काळे फासत मनसेने मराठीचा मद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे. अनेकदा मनसे मराठीच्या मुद्यावरुन रस्त्यावर उतरली आहे. मंगळवारी कल्याणमधील मनसेने मराठीचा मुद्दा पुन्हा हाती घेतल्याचे दिसून आले. यासाठी कल्याणमधील दुकानावरील पाट्यांना काळे फासत मनसेने आंदोलनाचा इशारा दिला. मनसेने या परिसरातील दुकानदारांना २ दिवसाचे अल्टिमेटम दिले असून मराठी पाट्या न लावल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

कल्याणच्या शिवाजी चौक परिसरात गेल्या काही महिन्यात अनेक नविन दुकाने सुरू झाली आहेत. तर अनेक दुकानदारांनी नूतनीकरण केले आहे. मात्र या दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या नावाच्या पाट्या केवळ इंग्रजीमध्ये लावल्या होत्या. नेमका हाच मुद्दा कल्याण शहर मनसेने हाती घेत ज्या दुकानांवर इंग्रजी पाट्या होत्या त्यांना काळे फासत आपला निषेध व्यक्त केला. येथील शिवाजी चौक ते मोहम्मद अली चौक परिसरात असणाऱ्या विविध दुकानांच्या पाट्यांना काळे फासत २ दिवसाचे अलटिमेटम दिले आहे. यावेळी काही दुकानांवर इंग्रजीबरोबरच मराठी पाट्या असतानाही त्यांना काळे फासल्याचे दिसून आले.

यावेळी झालेल्या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, माजी आमदार प्रकाश भोईर, कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, महिला आघाडीच्या शीतल विखणकर, स्मिता खरे यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान कल्याण शहर मनसेला मराठीच्या मुद्द्याला अचानक कशी काय जाग आली असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जातोय. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्या सृष्टी हॉटेलच्या इंग्रजी पाटीलाही मनसे कार्यकर्त्यांनी काळ फासल.