कल्याण-डोंबिवली शहरातील रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आखलेले घेराव आंदोलन बुधवारी आयुक्त मधुकर अर्दड यांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या स्थानिक नेत्यांना स्थगित करावे लागले. अर्दड येत्या रविवापर्यंत सुटीवर गेले आहेत. मनसेने यापूर्वीच आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची फारशी दखल न घेता आयुक्तांनी सुट्टीवर जाणे पसंत केल्याने मनसेच्या आंदोलनाचा बार फुसका ठरला आहे.
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी आता वेगवेगळ्या मुद्दय़ांवर आंदोलनाचा इशारा देण्यास सुरुवात केली आहे. साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीतून मनसेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले. मात्र त्यांना महापालिकेत फारसे काही प्रभावी करून दाखविता आलेले नाही. असे असताना निवडणुकीच्या तोंडावर मनसेने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले असून आयुत मधुकर अर्दड यांना लक्ष्य करत मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी चालविला आहे.