मनसे पदाधिकाऱ्याकडून दुसऱ्यांदा कृत्य; प्रवासी, वाहनचालकांना त्रास; कडोंमपा, पोलिसांचे दुर्लक्ष
शिळफाटा रस्त्यावर मनसे पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त आजदे गाव ते शिळफाटा रस्त्याच्या मुख्य रस्त्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेसुमार फलकबाजी केल्याने या रस्त्यावरून नियमित ये-जा करणारे वाहनचालक, सामान्य तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. रस्त्यांमधील दिशादर्शकांवर, कोपऱ्यांवर फलक लावण्यात आले आहेत. याच पदाधिकाऱ्याने काही महिन्यांपूर्वी तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यावर शिळफाटा रस्त्यावरील दिशादर्शकांवर आपल्या कौतुकाचे फलक लावले होते. त्या वेळीही वाहनचालकोंना त्रास सहन करावा लागला होता.
मनसेचे कल्याण तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील यांचा बुधवारी वाढदिवस असल्याने त्यांच्या हौशी, समर्थक कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपासून आजदे गाव ते शिळफाटा रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा, व्यापारी गाळे, दुकान, काही ठिकाणी दिशादर्शकांवर मोठय़ा प्रमाणात फलकबाजी केली आहे. यामुळे रस्ता परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे. पाटील काटई टोल नाक्याच्या परिसरात राहतात. त्या भागात मोठा लवाजमा, वाजंत्री वाजविण्यात येत असल्याचे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या काही प्रवाशांनी सांगितले.
राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. पाणीटंचाईने शहरे, गावे होरपळत आहेत. अशा परिस्थितीत बडेजावपणा करून वाढदिवस साजरे करून ही मंडळी काय साध्य करीत आहेत, असा प्रश्न शहरवासीय उपस्थित करीत आहेत. पाटील यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांनी अशीच फलकबाजी केली होती. या प्रकरणी जागृत भारत सेवाभावी संस्थेचे प्रशांत रेडिज यांनी मानपाडा पोलीस, तहसीलदार कार्यालयाकडे विद्रूपीकरणाबाबत तक्रारी केल्या होत्या; पण यापैकी कोणीही दखल घेतली नाही, असे रेडिज यांनी सांगितले. पोलिसांनी तुम्ही ग्रामपंचायतीत जाऊन तक्रार करा, असा सल्ला दिला. फुकटची फलकबाजी करून असे कार्यकर्ते शासनाचा महसूल बुडवत आहेत, याची शासन यंत्रणांनी दखल घ्यावी, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

अर्जुन पाटील यांनी स्वत:हून शिळफाटा रस्त्यावर फलक लावलेले नाहीत. पाटील यांच्या समर्थक, हौशी सहकाऱ्यांनी लावले असतील. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी फलकबाजी करू नका, असे आवाहन केले आहे. त्याचे पालन केले जात आहे. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी फलकबाजी केली असेल तर, त्यांना याबाबत माहिती देण्यात येईल.
– मनोज घरत, शहराध्यक्ष, मनसे