दुकानांच्या पाटय़ांची भाषाही पुन्हा तपासण्याचा राज ठाकरे यांचा इशारा

मराठीत कामकाज न करणाऱ्या  बँकांविरोधात आंदोलन पुकारण्याचे संकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी ठाणे येथे झालेल्या जाहीर सभेत दिले. राज्यातील सर्वच दुकानांच्या पाटय़ा मराठीत असाव्यात, यासाठी आम्ही आंदोलन केले होते. त्यानंतर चित्र पालटले, पण तरीही अजून काहीजण सुधारत नसल्याने ते आंदोलन पुन्हा हाती घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. राज्याची समृद्धी होणार असेल तर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आम्हाला आवडेल, पण स्वतंत्र राज्याचा विचार कराल तर हा मार्गच तोडून टाकू, असा इशाराही राज यांनी दिला.

एल्फिन्स्टन पुलावरील दुर्घटनेनंतर सर्वच रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. त्यावरून अनेक भागांत तोडफोडही झाली. त्या पाश्र्वभूमीवर ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरे म्हणाले की, कायदा तोडणाऱ्यांच्या बाजूने आम्ही एकही आंदोलन केलेले नसून आतापर्यंतची सर्वच आंदोलने ही कायदा मोडणाऱ्यांविरोधात होती. सरकारला जे जमत नाही ते आम्ही बाहेर राहून करून दाखवतो, असेही त्यांनी सांगितले.

राज्य भाषेनुसार बँकांचे कामकाज असले पाहिजे आणि तसा भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचा नियम आहे. मात्र, राज्यातील अनेक बँका हा नियम मोडतात. त्यामुळे बँकांचे कामकाज मराठीत आहे की नाही, हे तपासण्याचे आदेश राज ठाकरे यांनी या सभेत कार्यकर्त्यांना दिले.

उच्च न्यायालयाने फेरिवाल्याबाबत दिलेल्या आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी सरकार दुसऱ्या व्यक्तीला पुढे करून त्याच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी करत आहे. याबाबत सरकारमधील काही व्यक्तींनीच आपल्याला माहिती दिली आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. ठाण्यात फेरीवाल्यांविरोधात केलेल्या आंदोलनानंतर मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईच्या मुद्दय़ावरून पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. राज्यातील शहरांमध्ये दिवसेंदिवस परराज्यातील नागरिकांचे लोढे वाढत असल्यामुळे शहरातील विकासकामांवर जास्त पैसे खर्च होतात. त्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागांतील विकास कामांसाठी पुरेसा पैसे मिळत नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. गेल्या पंधरा वर्षांपूर्वी राज्यात आलेले सर्वच लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र, हे सरकार आता वातावरण बिघडवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पूर्वीप्रमाणेच सलोखा ठेवण्यासाठी माझा हात पुढे असेल. पण, वेगळे काही करायचा विचार असेल तर मग हाच हात वर जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सभेच्या काळात वीज पुरवठा आणि केबल बंद केले जात असल्याच्या पाश्र्वभूमीवर डरपोक, गोचू, बिनडोक आणि मूर्ख अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली. दरम्यान, ठाकरे हे सभेच्या दिशेने जात असताना एका चोरटय़ाने सभेच्या व्यासपीठाजवळ असलेल्या गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तिच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार वाहतूक शाखेचे पोलीस नाईक निलेश थोरात यांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी या चोरटय़ाला पकडले आणि नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

भाजपवर वार

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही ब्लु प्रिंट सादर केली होती आणि गुजरातमध्ये भाजप ब्लू फ्लिमच्या सीडी काढत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच हार्दिकच्या खासगी आयुष्यात कशासाठी डोकावता, असा प्रश्न केला. राहुल गांधी यांना पप्पू म्हणता मग एका पप्पूच्या धास्तीने तुम्ही पूर्ण पक्ष गुजरात निवडणुकीच्या प्रचारात का उतरविलात, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तर ‘या’ लोकांशीच लढावे लागेल

देशातील लोकसंख्येला आळा घालणे गरजेचे असतानाही रोहिंग्या सारखे बाहेरचे लोक देशात आणले जात आहेत. पाकिस्तान आणि बांग्लादेशातील नागरिकांचे देशात मोहल्ले उभे राहिले आहेत. त्यामुळे भविष्यात पाकिस्तानशी नव्हे तर देशातील या लोकांबरोबरच युद्ध करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.