22 November 2019

News Flash

रवी पुजारी गँगकडून मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना धमकी

याप्रकरणी पोलिसांनी पुजारी आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटकही केली आहे.

अविनाश जाधव, मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना कुख्यात रवी पुजारी गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिडडे ने दिलेल्या वृत्तानुसार, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना रवी पुजारी गँगने एका खंडणी प्रकरणात जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी पुजारी आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी संदेश शेट्टी याला अटकही केली आहे.

अटक करण्यात आलेला संदेश शेट्टी हा प्रभादेवी इथला रहिवासी आहे. त्याने सुरेश पुजारी आणि प्रकाश पुजारी यांच्यासाठी नवी मुंबईतील एका व्यावसायिकाकडे २४ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणाची माहिती कळताच अविनाश जाधव यांनी तातडीने शेट्टीशी फोनवरुन संपर्क केला. त्यानंतर शेट्टीने फोन उचलत आपल्याला पुजारीने असे करण्यास सांगितल्याचे म्हणत फोन मध्येच ठेऊन दिला.

त्यानंतर जाधव यांना एका आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरुन काही फोन आले, त्यामध्ये त्यांनी या खंडणी प्रकरणात पडू नये असे सांगत, त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या मोबाईल क्रमांकाचा तपास केल्यास तो सुरेश पुजारीचा सहकारी प्रसादचा असल्याचे उघड झाले.  नौपाडा पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.

First Published on June 20, 2019 2:33 pm

Web Title: mns thane district president avinash jadhav threatens to kill from ravi pujari gang aau 85
Just Now!
X