पालिका कार्यालयात धरणे आंदोलन
डोंबिवली विभागीय कार्यालयात सक्षम अधिकारी नाही, उपायुक्त नाहीत, नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी कल्याणला जावे लागते. गेली अनेक वर्षे ही परिस्थिती असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर जाग आली असून गुरुवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर धरणे धरून आंदोलनाचा बार उडवून दिला.
शहरातील अनधिकृत बॅनर तसेच इतर मुद्दय़ांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. डोंबिवलीतील नागरिकांना त्यांच्या कामासाठी कल्याणला जावे लागते. तेथे महापालिका उपायुक्त, प्रभाग अधिकारी, अभियंता उपस्थित नसतात. नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी ठोस अशी व्यवस्था नाही. अशी कारणे पुढे करत हे आंदोलन करण्यात आले. पाच र्वष या मुद्दय़ावर फारसे आक्रमक नसलेल्या मनसेचे कार्यकर्ते निवडणुकीच्या तोंडावर अचानक आक्रमक झाल्याची चर्चा आता रंगली आहे. शहर अध्यक्ष राजेश कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात महिला अध्यक्षा मंदा पाटील, गटनेते सुदेश चुडनाईक, मनोज घरत, प्राजक्त पोतदार, प्रकाश भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका अधिकारी आल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही.
येत्या दोन दिवसांत आम्हाला ठोस उपाययोजना, सक्षम अधिकारी आम्हाला हवा आहे, अन्यथा मोठय़ा स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजेश कदम यांनी यावेळी दिला. याविषयी पालिकेचे उपआयुक्त सु.रा.पवार म्हणाले, अनधिकृत फलक हटविण्याचे निर्देश देण्यात आले असून कारवाई सुरू आहे. तसेच दोन प्रभागांची जबाबदारी एका उपायुक्ताकडे असते, माझ्याकडे डोंबिवलीतील प्रभागांची जबाबदारी नाही असे सांगितले.