ठाण्यातील सर्वात मोठा मॉल म्हणून परिचित असलेल्या विवियाना मॉलमधील महिलांच्या स्वच्छतागृहात चोरून मोबाइल चित्रीकरण केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी एका महिलेला हा प्रकार अनुभवास आला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
येथील हिरानंदानी मेडोज परिसरात राहणारी ३५ वर्षीय महिला पतीसोबत रविवारी विवियाना मॉलमध्ये गेली होती. रात्री १२च्या सुमारास ही महिला मॉलमधील स्वच्छतागृहातील एका खोलीत गेली. स्वच्छतागृहाला लागूनच असलेल्या बाजूच्या खोलीतून एक व्यक्ती मोबाइलद्वारे चित्रीकरण करीत असल्याचे या महिलेच्या लक्षात आले. तिने तातडीने बाहेर येऊन याविषयी पतीला माहिती दिली. पतीनेही चित्रीकरण करीत असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी संबंधित खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरून चित्रीकरण करीत असलेल्या व्यक्तीने महिलेच्या पतीला धक्का देत घटनास्थळावरून धूम ठोकली. या संदर्भात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. जी. गावित तपास करीत आहेत. त्यासाठी विवियाना मॉलच्या सीसीटीव्ही चित्रीकरणाचीही तपासणी सुरू आहे.
दरम्यान, तपासात पोलिसांना  आम्ही संपूर्ण सहकार्य करीत आहोत, असे विवियाना मॉलच्या व्यवस्थापनाने सांगितले.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना गोव्यातील एका शोरूममध्ये छुप्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणाचा अनुभव आल्यानंतर मुंबईतील मॉल्सचीही छाननी करण्यात आली होती.