प्रा. मोरे, तोरसेकर यांचे प्रतिपादन
हिंदुहिताची पाठराखण म्हणजे जातीव्यवस्था मानणे, लोकशाही झिडकारणे, धर्म स्वातंत्र्य नाकारणे, स्त्री- पुरुष समानता नाकारणे, हिंसेचे समर्थन करणे असा तद्दन खोटा प्रचार तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रात करीत आहेत. त्यांची दहशत जबर प्रभावी आहे. त्यामुळे बुद्धिवादी आणि विज्ञाननिष्ठ असलेले हिंदूंही स्वत:ला पुरोगामी म्हणून सिद्ध करण्यासाठी हिंदू आणि हिंदुत्वाच्या विरोधात बोलतात. भारतातील सर्वाधिक प्रखर पुरोगामी असलेल्या सावरकरांवर प्रतिगामी असल्याचा शिक्का मारणाऱ्या तथाकथित पुरोगाम्यांना प्रा. शेषराव मोरे यांनी आपल्या व्याख्यानात सणसणीत टोले हाणत आधी सावरकर नीट वाचा, असे आवाहन करत पुरोगामित्वाचा दहशतवाद संपवून खऱ्या अर्थाने पुरोगामी व्हा, असे सुनावले. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणात ढोंगी पुरोगाम्यांचा चांगलाच समाचार घेतला. पुरोगामी हे भामटे आहेत, असा थेट आरोप तोरसेकर यांनी केला. हा दहशतवाद मोडण्यासाठी विवेकी विचारांचा विधायक ठामपणा, आग्रह गरजेचा असल्याचेही तोरसेकर यांनी सांगीतले.
विचार व्यासपीठ या खुल्या मंचातर्फे येथील श्रीराम व्यायाम शाळेच्या मैदानात ‘पुरोगामी दहशतवाद’ या विषयी शनिवारी सायंकाळी ज्येष्ठ विचारवंत व चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे व ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे भाषण आयोजित केले होते. व्याख्यानाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन पत्रकार, माध्यम सल्लागार मकरंद मुळे यांनी केले.
यावेळी बोलताना मोरे म्हणाले, पुरोगामी म्हणवून घेणारी मंडळी ज्यांचा विरोध करतात, त्या विचारांचा ते हेतुत: अभ्यास करत नाहीत. त्यांच्याशी चर्चा करीत नाही. संवाद साधत नाहीत. केवळ हिंदुत्वाला विरोध हा एकमेव अजेंडा असलेल्या या मंडळींनी महाराष्ट्रात एकप्रकारचा दहशतवाद मांडला आहे. या दहशतवाद्यांनी सावरकरांवर प्रतिगामी असा शिक्का मारला. वास्तविक सावरकर वस्तुनिष्ठ धर्मचिकित्सक होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुत्ववादी असल्यामुळे सर्वाधिक बुद्धिवादी व खऱ्या अर्थाने सेक्युलर असलेल्या सावरकरांवर पुरोगाम्यांनी अनेक वर्षे अन्याय केला आहे. याच पुरोगाम्यांनी सावरकर, हिंदू, हिंदुत्व या विषयावर आस्था असलेल्यांना लांब ठेवण्याचे प्रयत्न केले, असे प्रा. मोरे यांनी सांगितले.
व्याख्यानाला ठाणेकरानी चांगला प्रतिसाद दिला. महिला व तरुणांची संख्या लक्षणीय होती. मुलुंड, डोंबिवली, विक्रोळी, कल्याण परिसरांतून नागरिक व्याख्यानासाठी आले होते. संजीव ब्रrो, भा. वा. दाते, अंजली शेळके-ढोबळे, प्रमोद घोलप, निशिकांत महांकाळ, अरविंद जोशी, स्वानंद गांगल आणि मकरंद मुळे यांच्या पुढाकाराने व विचार व्यासपीठाच्या माध्यमातून हे व्याख्यान झाले.