जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासन अद्यापही तात्पुरत्या जागेच्या शोधात

ठाणे जिल्ह्य़ातील गोरगरीब रुग्णांच्या उपचारांसाठी एकमेव पर्याय असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पुर्नबांधणीस राज्य शासनाने मंजुरी दिली असली तरी या कामाचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे.

या रुग्णालयाची पुर्नबांधणी होण्याच्या काळात वागळे इस्टेट येथील कामगार रुग्णालयात येथील रुग्णांची तात्पुरती व्यवस्था करण्याचा प्रस्ताव होता. मात्र कामगार रुग्णालयाचीही अवस्था दयनीय असल्याने हा प्रस्ताव बारगळला.

रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात आजवर तीन ते चार वेळा प्लास्टरचा काही भाग कोसळ्ल्याचा प्रकार घडला होता. यानंतर जुन्या इमारतींच्या पुर्नबांधणीला राज्य सरकारने मंजुरी  दिली. यासाठी पाच कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. मात्र आधुनिकीकरणाच्या कामासाठी रुग्णालय अन्य ठिकाणी हलवावे लागणार आहे. मात्र गेले कित्येक महिने प्रयत्न करूनही अद्याप योग्य जागा मिळू शकली नाही.

राष्ट्रीय आरोग्य मोहीम विभागाचे आयुक्त परिमल सिंग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी सर्व संबंधितांची बैठक झाली. त्यात रुग्णालय अन्य कुठे स्थलांतरित होऊ शकेल, याविषयीच्या पर्यायांची चाचपणी झाली.

जिल्हा रुग्णालयात आंतर विभाग तसेच बाह्य़ विभागात दररोज शेकडो रुग्ण दाखल होत असतात. रुग्णालय पुर्नबांधणीच्या काळात त्यांच्या उपचारांसाठी पर्याय व्यवस्था करणे भाग आहे. अन्यथा जिल्ह्य़ातील आरोग्य सुविधांवर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे.

गुरुवारच्या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी कामगार रुग्णालयाची परिस्थिती बिकट असून तिथे जिल्हा रुग्णालय हलविणे शक्य नसल्याचे सांगितले. त्याचबरोबरच त्यांनी रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यासाठी अन्य पर्याय सुचविले.

गैरसोयच

कशिश पार्क येथील निवासी संकुलातील वाहनतळाच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात रुग्णालय स्थलांतरित करता येईल. तसेच रुस्तमजी आणि मुंब्रा येथील काही जागाही  विचारात घेण्यात आल्या आहेत. मात्र या सर्वच जागा रुग्णांना ये-जा करण्याच्या दृष्टीने गैरसोयीच्या आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. रुग्णांच्या दृष्टीने सोयीचे असणाऱ्या ठिकाणीच सध्याचे रुग्णालय हलविण्यात येईल.

– डॉ. कैलास पवार, शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय