नव्या बैठक रचनेमुळे प्रवाशांचे हाल; कळव्यातील कुटुंबाला विरार गाडीत जबर मारहाण

मुंबई उपनगरी रेल्वेच्या प्रवासात उभे राहायला जागा मिळणेही कठीण असताना सीटवर बसण्यावरून घडणारे वादावादीचे प्रसंग नवे नाहीत. मात्र, गेल्या काही दिवसांत घडलेल्या दोन घडामोडींनी रेल्वेगाडीतील आसनव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत, कसारा मार्गावरील गाडय़ांतील आसन व्यवस्थेत बदल करण्यात आल्याने प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळणेच कठीण बनले आहे. यावरून या मार्गावरील लोकलगाडय़ांत प्रवाशांमध्ये खटके उडू लागले आहेत. दुसरीकडे, विरार लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून कळव्यातील एका कुटुंबातील आठ जणांना तरुणांच्या एका गटाने जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली.

मुंबईतील उपनगरीय गाडय़ांमध्ये तीन जणांची आसनव्यवस्था असली तरी, प्रवाशांनी सांमजस्याने त्यात ‘चौथ्या सीट’साठीही जागा करून दिली. त्यामुळे एका बाकडय़ावर चौघे जण बसल्याचे चित्र मुंबईतील लोकलगाडय़ांत सर्रास पाहायला मिळते. मात्र, मध्य रेल्वेने गेल्या काही दिवसांपासून कर्जत व कसारा मार्गावरील लोकलच्या डब्यांतील आसनक्षमता कमी केल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. गाडीतील १, ६, ९ आणि १० क्रमांकाच्या डब्यातील दरवाजाजवळचे तीन आसन क्षमता असलेले बाकडे काढून त्या जागी प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा मोकळी केली आहे तर चौथ्या डब्यात मेट्रो गाडीप्रमाणे आसन व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी खूपच कमी जागा उपलब्ध झाली आहे.

या नव्या रचनेत २४ आसने कमी होत असली तरी त्यामुळे ५६ प्रवाशांना व्यवस्थित उभे राहण्यासाठी जागा उपलब्ध होते, असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. चौथ्या डब्यात मेट्रोप्रमाणे खिडकीला समांतर आसन व्यवस्था आहे. त्यामुळे त्या डब्यात ११२ प्रवासी उभे राहू शकतात. आसन व्यवस्थेतील हा बदल फक्त द्वितीय श्रेणीतील डब्यांमध्येच करण्यात आला आहे. त्यामुळे एका गाडीत ३३६ अधिक प्रवासी प्रवास करू शकतील, असे रेल्वे प्रशासनाचे मत आहे.

जागेच्या वादातून कुटुंबावर हल्ला

वसई : विरार लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील आठ जणांना तरुणांच्या एका गटाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोन ज्येष्ठ नागरिकांसह आठही जण जखमी झाले आहेत. इतर प्रवाशांनी या टोळक्यातील तिघांना पकडून वसई रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. विरार रेल्वे स्थानकात मंगळवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.

कळवा येथे राहणारे प्रजापती कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक असे २० जण तीर्थयात्रेसाठी निघाले होते. मंगळवारी दुपारी मुंबादेवी आणि महालक्ष्मी मातेचे दर्शन करून ते विरारच्या जीवदानी येथे दर्शनासाठी आले होते. सायंकाळी  साडेचारच्या सुमारास त्यांनी विरार स्थानकातून चर्चगेटला जाणारी ट्रेन पकडली होती. ट्रेनच्या डब्यात एक जागा रिकामी असल्याने त्या जागेवर रामसूरत प्रजापती (३३) यांनी आपली आजी भानामाती (६५) यांना बसवले. मात्र एका टोळक्याने विरोध केला आणि वाद सुरू झाला. या वादानंतर त्या तरुणांनी प्रजापती यांच्या सर्व कुटुंबीयांवर हल्ला केला. आम्हाला चामडी पट्टा आणि धारदार वस्तूंनी मारहाण केल्याचे रामसूरत याने सांगितले. हल्लेखोर तरुणांनी प्रजापती कुटुंबीयांचे सामानही फेकून दिले. या मारहाणीत प्रजापती कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक राममीलन (७०), भानामती (६५), रामसूरत (३३), कृपाल (२२) हे गंभीर जखमी झाले, तर इतर चौघांनाही दुखापत झाली. या मारहाणीत भानामती या बेशुद्ध होऊन पडल्या होत्या. हा प्रकार डब्यातील इतर प्रवाशांनी पाहिल्यानंतर मारहाण करणाऱ्या चौघांना पकडून वसई रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.

‘आम्हाला वृद्ध महिला बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसले आणि तरुणाचा एक गट मारहाण करत असल्याचे दिसले,’ असे या हल्लेखोरांना पकडून देणारे बनसोडे यांनी सांगितले. आम्ही इतर प्रवाशांच्या मदतीने दुसऱ्या डब्यात जाऊन तीन तरुणांना पकडले आणि त्यांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे त्यांनी सांगितले. वसई रेल्वे पोलिसांनी मारहाण करणारे किशोर भालेराव (३१), सागर गायकवाड (१९) आणि रोहित गायकवाड (१९) या तिघांना मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. त्यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर जामिनावर मुक्तता करण्यात आली. हल्लेखोर तरुण विरार येथे राहणारे आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.