दिल्लीच्या धर्तीवर प्रत्येक प्रभागात मोफत दवाखाने

ठाणे शहरातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळवून देण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने आता प्रत्येक प्रभागात ‘मोहल्ला क्लिनिक’ सुरू करण्याचा बेत आखला आहे.

सरकारी रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी तसेच नागरिकांना स्थानिक ठिकाणीच मोफत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर हे मोफत दवाखाने सुरू करण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत आणण्यासाठी सेनेने जोरदार प्रयत्न चालवले आहेत.

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा परिसरात महापालिकेची २५ आरोग्य केंद्रे आहेत. याठिकाणी गरजू रुग्णांवर उपचार केले जातात. कळवा येथे पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असून येथील बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र ठाणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे या आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने शहराच्या प्रत्येक प्रभागात ‘मोहल्ला क्लिनिक’ सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर मिनाक्षी शिंदे यांनी अशाप्रकारचा उपक्रम राबविणाऱ्या संस्थांसोबत बैठका घेतल्या आहेत. या संस्थांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेना महापालिका प्रशासनामार्फत सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

संकल्पना काय?

* मोहल्ला क्लिनिकची संकल्पना दिल्लीत राबविली जात असून ठाणे शहरातही अशाच प्रकारची संकल्पना राबविली जाणार आहे.

* ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांमध्ये १३१ नगरसेवक आहेत. या सर्व प्रभागांमध्ये मोबाइल व्हॅनद्वारे ठरावीक वेळेत खासगी संस्था महापालिकेच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी आणि औषधांचे वाटप करेल, अशी सुरुवातीला संकल्पना होती. मात्र, आता त्यात बदल करून प्रभागांमध्ये भाडय़ाने जागा घेऊन त्याठिकाणी मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे.

* खासगी संस्थेचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमार्फत मोफत आरोग्य सुविधा पुरविली जाणार आहे. या प्रकल्पासाठी येणारा खर्च महापालिका करेल.

* ज्या ठिकाणी आरोग्य केंद्र असतील त्या ठिकाणी मात्र जागा भाडय़ाने घेतली जाणार नाही.

खासगी रुग्णालयांचा खर्च अनेकांना परवडत नाही आणि महापालिका आरोग्य केंद्र तसेच कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी असते. त्यामुळे नागरिकांना प्रभागातच आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ‘मोहल्ला क्लिनिक’ संकल्पना राबविण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

-मिनाक्षी शिंदे, महापौर, ठाणे.