कल्याणच्या पिसवली परिसरात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिच्या आईला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीचा पाठलाग केल्याचा जाब विचारल्यानंतर तिच्या आईला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात विनयभंग करणाऱ्या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पूर्वेकडील पिसवली परिसरात राहणारी अल्पवयीन तरुणी शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास आदर्श नगरहून पिसवलीच्या दिशेने आपल्या घरी जात होती. यावेळी याच परिसरात राहणाऱ्या विकी दुबे या तरुणाने तिचा पाठलाग करुन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने तेथून काढता पाय घेतला आणि थेट आपल्या घरी गेली. मात्र विकीने तिचा पाठलाग करत तिचे घर गाठले. घडल्या प्रकाराबाबत पीडित मुलीने आपल्या आईला सांगितले. त्यावेळी मुलीच्या आईने विकीला जाब विचारला असता संतापलेल्या विकीने पिडीतेच्या आईला शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी सदर पीडित मुलीने आपल्या आईसह मानपाडा पोलीस ठाणे गाठले. मानपाडा पोलीस स्थानकात विकी दुबे याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पिडीत अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, मानपाडा पोलिसांनी विकी दुबेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.