डोंबिवलीतील ‘मॉम्स मिरॅकल ऑफ ममाज्’ या नावातच आईच्या हातचे पदार्थ खाण्याची जादू लपलेली आहे. या उपहारगृहात मिळणाऱ्या भारतीय पदार्थाना खास इटालियन फोडणी देण्यात आली आहे, त्यामुळे या पदार्थाना वेगळीच चव येते आणि खवय्यांची या उपहारगृहात गर्दी होते. पिझ्झाची चटणी, चमचमीत मिनी फ्रँकी, चॉकलेट सँडविच हे नानाविध पदार्थ खवय्यांची रसना तृप्त करतात.

पोटभर खावे आणि स्वस्थ राहावे हा भारतीयांचा मूलमंत्रच आहे. त्यामुळे प्राचीन काळापासूनच पौष्टिक खाणे ही भारतीयांची परंपरा राहिली आहे. त्यामुळे दक्षिणेतील इडली-डोसा, पंजाबमधील मक्के की रोटी, तर महाराष्ट्रातील पोळी-भाजी हा नेहमीचा आहार खूपच पौष्टिक असतो. आजीच्या किंवा आईच्या हातचे लाडू, चिवडा तसेच विविध चवीचे खाद्यपदार्थ आपल्याला नेहमीच हवेहवेसे वाटतात. त्यात जर कुणी मायेने पदार्थ खाऊ घालत असेल तर त्या पदार्थाची खुमारी अधिकच वाढते. डोंबिवलीतील ‘मॉम्स मिरॅकल ऑफ ममाज्’ त्यापैकी एक. मॉम्स मॅजिक या नावातच आईच्या हातचे पदार्थ खाण्याची जादू लपलेली आहे. एखादीआई जशी आपल्या बाळाच्या खाण्यापिण्याकडे कटाक्षाने लक्ष देते, त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा खवय्यांची आवड-निवड आणि पदार्थाच्या पौष्टिकतेकडे आवर्जून लक्ष देत असल्याचे ‘मॉम्स मिरॅकल ऑफ ममाज्’च्या पल्लवी समेळ यांनी सांगितले. इथे भारतीय आणि इटालियन पदार्थाची सरमिसळ म्हणजे फ्यूजन मिळते.

येथील पिझ्झाची चटणी अतिशय चविष्ट असते. ‘पिझ्झा’ प्रकारात छोटा (मिनी) पिझ्झाही खवय्यांसाठी उपलब्ध आहे. खास पालकांच्या आग्रहास्तव हा पिझ्झा सुरू केला आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी हमखास मिनी पिझ्झाची ऑर्डर दिली जाते. साहजिकच लहान मुले हा पूर्ण पिझ्झा संपवतात. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा शाळेतील चिमुरडय़ांसाठी १५ रुपयांची चमचमीत मिनी फ्रँकी येथे उपलब्ध आहे. चॉकलेट सॅन्डविचलाही येथे भरपूर मागणी असते. यांचे स्वयंपाकघर डोंबिवली येथील नवापाडा येथे आहे. रोज सकाळी ४ वाजता येथे सहा ते सात प्रकारच्या विविध चटण्या तयार केल्या जातात. या चटण्या तयार करताना त्यांचे यजमान मंदार समेळ जातीने उपस्थित असतात. विविध सभा समारंभांच्या ऑर्डर्स येथे स्वीकारल्या जातात. येथे समोसा, उपमा, पॅटिस या पदार्थाना विशेष मागणी आहे. दिवसभरात साधारण ५०० समोसे संपतात. ‘मॉम्स मॅजिक’ या दुकानाला येत्या १ मे रोजी चार दशके पूर्ण होणार आहेत.

पल्लवी समेळ यांच्या सासुबाई सरला समेळ यांनी वडापावपासून हे दुकान सुरू केले होते. एखादा गरजू किंवा भुकेला कोणी दिसला की त्या त्याला सढळ हस्ते मदत करीत. पदार्थ प्रेमाने खाऊ घातले तरच पदार्थाना उत्कृ ष्ट चव येते, अशी त्यांची शिकवण होती. त्यामुळे आम्हीही खवय्यांना पदार्थ देताना छान सजवून आणि प्रेमाने खाऊ  घालत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे येथे खवय्यांची गर्दी झालेली दिसून येते. व्हेज मश्रूम-पनीर, चीज फ्रँकी तयार करताना मश्रूम आणि पनीर तव्यावर छान भाजले जातात. त्यानंतर त्यात चटणी टाकून ती फ्रँन्की अधिक चविष्ट बनविली जाते. विशेष म्हणजे खवय्यांच्या खिशालाही हे अगदी सहज परवडणारे आहेत. येथे मिळणारा मिनी पिझ्झा ३० ते ४० रुपयापर्यंत उपलब्ध आहे. जास्तीत जास्त २०० रुपयांपर्यंत येथे पदार्थ मिळतात. शिवाय एखादा पदार्थ बनविण्यास उशीर होणार असेल तर खवय्यांना तशी स्पष्टपणे कल्पना दिली जाते.  ‘मॉम्स मिरॅकल ऑफ ममाज्’ची डोंबिवली पश्चिम विभागात दोन, तर पूर्वेला एक दुकान आहे. या सर्व दुकानांमध्ये नवापाडा येथील  केंद्रीय स्वयंपाकघरात बनविलेले पदार्थच असतात. त्यामुळे तिन्ही दुकानातील पदार्थाना एकसारखी चव असते. याशिवाय भेळ, पाणीपुरी, चायनीज भेळ, मंच्युरियन आदी पदार्थही येथे मिळतात. गेल्या चार दशकात ‘मॉम्स मॅजिक’ने डोंबिवलीत स्वत:चा चांगला ब्रॅन्ड तयार केला आहे.

मॉम्समिरॅकल ऑफ ममाज

  • कुठे ? नववृषाली को-ऑप. हौ. सोसायटी, आदित्य मंगल कार्यालयासमोर, आगरकर रोड, डोंबिवली (पूर्व.)
  • वेळ – सकाळी १० ते रात्री १०