ठाणे : सहा कोटी रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात एका बांधकाम व्यावसायिकाकडून सुरक्षा ठेव म्हणून दोन कोटी रुपये घेऊन पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. विनोदकुमार झा (४८) आणि अमितकुमार यादव (२६) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून दोन कोटी रुपये जप्त केले आहेत.

मुंबईमध्ये एक बांधकाम व्यावसायिक राहतात. त्यांना व्यवसायासाठी ६ कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. याच दरम्यान, त्यांची ओळख विनोदकुमार याच्यासोबत झाली. त्याने बांधकाम व्यावसायिकाला कर्ज काढून देतो तसेच बँकेच्या एका अधिकाऱ्याला भेटवून देतो अशी बतावणी केली. बुधवारी बांधकाम व्यावसायिकाला विनोदकुमारने ठाणे रेल्वे स्थानक परिसरात भेटण्यासाठी बोलावले. तसेच येताना कर्जाच्या रकमेची सुरक्षा ठेव म्हणून २ कोटी रुपये आणण्यास सांगितले. बांधकाम व्यावसायिक ठाणे रेल्वे स्थानक परिसरात आले असता, विनोदकुमार आणि त्याचा सहकारी अमितकुमारही त्या ठिकाणी आले. या दोघांनी बांधकाम व्यावसायिकाकडे असलेले २ कोटी रुपये घेतले. हे पैसे बँकेत भरण्यास नेतो आणि आर.टी.जी.एस. पावती आणतो असे सांगून दोघांनी त्या ठिकाणाहून पलायन केले. मात्र, उशिरापर्यंत हे दोघेही न परतल्याने गुरुवारी बांधकाम व्यावसायिकाने याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एककडून सुरू होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या पथकातील साहाय्यक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, समीर अहिरराव आणि संदीप बागूल यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान, यातील आरोपी हे पवन एक्स्प्रेसने बिहारच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधून विनोदकुमार आणि अमितकुमार या दोघांना मध्य प्रदेशातील खंडवा येथून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता पोलिसांना त्यांच्याकडून दोन कोटी रुपये जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.