परिसरातील निवासी संकुलांत माकडांचा उच्छाद; पकडण्यात वनविभागही हतबल

निसर्गाच्या सान्निध्यातील उपनगर म्हणून घरांसाठीचा पसंतीचा पर्याय ठरत असलेल्या ठाण्यातील घोडबंदर परिसरात वन्यजीव आणि मानवी संघर्षांचे नवे उदाहरण समोर येत आहे. घोडबंदर, पारसिक डोंगर, माजिवडा या परिसरांतील निवासी संकुलांमध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांच्या टोळय़ांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. घरांमध्ये शिरून खाद्यपदार्थ पळवणे, सामानाची नासधूस करणे, रहिवाशांच्या अंगावर धावून जाणे अशा मर्कटचाळय़ांमुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत.  समूहाने शहरवस्तीत प्रवेश करणाऱ्या या माकडांना पकडणे वनविभागालाही कठीण होऊन बसल्याने आता माकडांना पळवण्याऐवजी त्यांच्यापासून स्वरक्षण कसे करावे, याचे धडे वनविभाग आणि प्राणिमित्र संघटनांमार्फत दिले जात आहेत.

पाणी किंवा खाद्याच्या शोधात जंगलातील माकडे शहरवस्तीत येण्याचे प्रकार उन्हाळ्यात होत असतात. मात्र ऐन पावसाळ्यातही जंगलातील माकडे समूहाने गृहसंकुलात घुसखोरी करू लागली आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून माजिवडा परिसरातील भारत टॉवर, ऑर्किड, परमेश्वरी आणि जयदीप या सोसायटी परिसरात माकडांच्या टोळीने धिंगाणा चालवला आहे. उघडय़ा खिडक्यांतून घरात प्रवेश करून फ्रीजमधील पदार्थ पळवणे, सामानांची नासधूस करणे, घरांतील व्यक्तींच्या अंगावर धावून जाणे असे प्रकार या माकडांकडून करण्यात येत आहे.

‘ही माकडे टोळय़ांनी फिरतात. त्यामुळे एखाद्या माकडाला पकडले तर, अन्य माकडे हिंसक होऊन हल्ले करतात. त्यामुळे त्यांना पकडण्यात अडचणी येत आहेत,’ अशी माहिती प्राणिमित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिली. माकड दिसल्यास काही नागरिक त्यांना खायला काही पदार्थ देत असल्याने माकडांना जंगल सोडून शहरातील रस्त्यावर खाद्यासाठी येण्याची सवय लागते. परिणामी ज्या ठिकाणी सहज खाद्यपदार्थ उपलब्ध होतील अशा ठिकाणी माकडांचे वास्तव्य वाढते, असे वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशनचे आदित्य पाटील यांनी सांगितले.

वनविभागाची जनजागृती मोहीम

शहरात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या माकडांच्या वास्तव्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी ठाणे वनविभागाने पुढाकार घेतला असून प्राणीसंस्थांच्या मदतीने ठाणे शहरात विविध परिसरात विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.

माकड शहरवस्तीत आल्यास कोणती खबरदारी घ्यावी, माकडांना खाद्यपदार्थ देऊ नये, माकडांनी घरात प्रवेश केल्यास बाहेर पडण्यासाठी दरवाजा, खिडक्या उघडय़ा ठेवाव्यात, घरात आलेल्या माकडांना बाहेर पडण्यासाठी असलेल्या मार्गाची दिशा द्यावी अशा प्रकारची माहिती देणारे परिपत्रक वनविभागातर्फे गृहसंकुलात वितरित करण्यात येत आहेत.

तक्रार कशी करावी?

कोणत्याही परिसरात माकडांचे वास्तव्य आढळल्यास, प्राणीविषयक काही तक्रार असल्यास वनविभागाच्या १९२६ या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे. या क्रमांकावर करण्यात आलेली तक्रार त्वरित संबंधित विभागाच्या उपवनसंरक्षकाकडे कळवण्यात येते. यानुसार उपवनसंरक्षकाच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी तक्रार कोणत्या विभागातून आली आहे याची तपासणी करून तक्रार करणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधतात.

शहरवस्तीत माकड येणे हे पूर्वीपासून आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम ठाणे वनविभागातर्फे सुरू आहे. गृहसंकुल परिसरात माकडांचे वास्तव्य आढळल्यास नागरिकांनी १९२६ या क्रमांकावर वन विभागाशी संपर्क साधावा.

डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक- ठाणे वनविभाग