पाण्याच्या शोधात आलेल्या टोळीकडून नागरिकांना उपद्रव

ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरातील पाडा क्रमांक चार भागात गेल्या चार दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर माकडांचा उपद्रव वाढला असून यामुळे या भागातील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या नागरी वस्त्यांमधील घराबाहेर ठेवण्यात आलेल्या पिंपामधील पाणी पिणे, घराच्या छतावरून उडय़ा मारणे असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून ही माकडे करत आहेत. जंगलातील पाण्याचे स्रोत आटू लागल्याने माकडांचा प्रवास शहरांच्या दिशेने सुरू झाल्याने वन्य अभ्यासकांचे म्हणणे आहे.

लोकमान्य नगर येथील पाडा क्रमांक चार या भागात मोठय़ा प्रमाणावर रहिवासी वसाहत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागूनच असलेल्या या भागात अनेकदा जंगली प्राण्यांचा वावर असतो. परंतु गेल्या चार दिवसांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगली माकडे पाण्याच्या शोधात जंगलातून खालच्या दिशेने लोकमान्य नगर परिसरात येत आहेत. तब्बल १० ते १२ माकडांची टोळी असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. दुपारी दोन वाजल्यानंतर माकडे जंगलातून खालच्या दिशेने असणाऱ्या लोकवस्तीमध्ये येऊन घराच्या एका छतावरून दुसऱ्या छतावर उडी मारत असल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. उन्हाळा सुरू झाल्यामुळे जवळच असणाऱ्या जंगलातील पाणीसाठा कमी झाला आहे. विहिरींमधील पाण्याची पातळी कमी झाल्याने माकडे या विहिरींमध्ये खोलवर उतरू शकत नाहीत. या प्राण्यांना मोठय़ा प्रमाणावर पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे लोकमान्य नगर पाडा क्रमांक चार येथील वसाहतीत ही माकडे पाण्याच्या शोधात येतात, असे  नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

या परिसरात ही माकडे पाण्याच्या शोधात आली की त्यांना काही नागरिकांकडून हुसकावण्यात येते. त्यामुळे ही माकडे अधिक हिंसक बनतात. त्यामुळे स्थानिकांना त्यांचा आणखी त्रास होत आहे.

लोकमान्य नगर, इंदिरानगर, उपवन, लोकपूरम, पवारनगर, घोडबंदर परिसर ही ठिकाणे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून आहेत. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याचा साठा कमी झाल्याने जंगलातील माकडे या जवळच्या लोकवस्तींमध्ये पाण्याच्या शोधात येतात. परंतु लोकवस्तीत आल्यामुळे त्यांना धोका पोहचण्याची दाट शक्यता असते. आमच्या संस्थेतर्फे लवकरच वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन कृत्रिम पाण्याच्या साठय़ांसाठी उपाययोजना करण्यासंबंधी चर्चा करण्यात येणार आहे.

– आदित्य पाटील , वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन