19 February 2020

News Flash

नागरी वस्तीत माकडांचा धुमाकूळ

पावसात भिजू नये म्हणून माकडांच्या टोळ्या गच्चीच्या शेडचा आधार घेत आहेत.

 || नीलेश पानमंद

राष्ट्रीय उद्यानालगतच्या परिसरातील नागरिकांना उपद्रव; घरात शिरून वस्तूंची नासधूस, इंटरनेट-केबल वाहिन्यांचेही नुकसान

ठाणे शहराच्या हद्दीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगरालगत असलेल्या वागळे इस्टेट, घोडबंदर आणि पोखरण या परिसरांतील नागरी वस्त्यांमध्ये माकडांनी धुमाकूळ घातला आहे. अन्नाच्या शोधात जंगलातून शहराकडे आलेल्या माकडांच्या टोळ्या थेट घरांत शिरून मौल्यवान वस्तूंची नासधूस करत आहेत. इमारतींवरून उडय़ा मारत संचार करणाऱ्या या माकडांनी परिसरातील इंटरनेट तसेच केबलच्या वाहिन्याही तोडून टाकल्या आहेत. मात्र या माकडांवर नियंत्रण आणण्यात वनविभागही अपयशी ठरत आहे. वागळे इस्टेट, पोखरण तसेच घोडबंदरचा भाग राष्ट्रीय उद्यानाला लागूनच आहे. येथील वसाहतींमध्ये माकडांचा वावर नेहमीच असतो. सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात जंगलातील फळझाडे तसेच अन्य खाद्यांचा स्रोत आटल्यानंतर माकडांच्या टोळ्या शहरांत वावरू लागतात आणि पावसाळ्याच्यापूर्वी त्या पुन्हा जंगलात परततात. परंतु यंदा भर पावसाळ्यातही माकडांचा नागरी वस्त्यांमध्ये मुक्काम कायम आहे. लोकमान्यनगर, इंदिरानगर, सावरकरनगर, यशोधननगर, शिवाईनगर, गणेशनगर, देवदयानगर, वसंतविहार, उपवन तसेच पोखरण दोन परिसरात माकडांच्या टोळ्या शिरल्या असून या टोळ्यांकडून इमारतीमधील तसेच चाळीतील घरांमध्ये शिरून साहित्याची नासधूस करण्याचे प्रकार सुरू आहेत. घरातील खाद्यपदार्थासह टीव्ही तसेच अन्य विद्युत उपकरणे तोडफोड करण्याचे प्रकार माकडांकडून सुरू असून यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

या भागातील इंटरनेट आणि केबल वाहिन्या तोडत असून यामुळे परिसरातील इंटरनेट आणि केबल सेवा वांरवार ठप्प होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी वाढू लागल्याने केबल आणि इंटरनेट सेवा पुरविणारे चालकही हैराण झाले आहेत. या माकडांच्या टोळ्या आता पाचपाखाडी भागापर्यंत पोहोचू लागल्या आहेत.

इमारतींच्या शेडचा आधार

ठाणे शहरातील बहुतांश इमारतीच्या गच्चीवर पत्र्याची शेड उभारण्यात आली असून गच्चीवर नागरिकांचा वावर कमी असतो. त्यामुळे पावसात भिजू नये म्हणून माकडांच्या टोळ्या गच्चीच्या शेडचा आधार घेत आहेत. तसेच शहरातील नागरिकांकडून त्यांना खाद्यपदार्थ मिळत असल्यामुळे माकड जंगलात परतत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

लहान मुलांवर हल्ल्याची भीती

ठाणे शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या परिसरात अनेक शाळा आहेत. यामुळे माकडांकडून शालेय विद्यार्थ्यांसह परिसरातील लहान मुलांवर हल्ले होण्याची भीती व्यक्त होत आहे.उन्हाळ्यात पाणी आणि खाद्यपदार्थाच्या शोधात माकडे लोकवस्तीमध्ये येतात.

पावसाळा सुरू झाल्यानंतर माकडे जंगलात परतात. मात्र या माकडांना नागरिकांकडून खाद्यपदार्थ मिळू लागल्याने ती परतत नाहीत. मात्र आता खाद्यपदार्थ मिळणे बंद झाले तर ते हल्ले करू शकतात.– आदित्य पाटील, अध्यक्ष, वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन

राष्ट्रीय उद्यानालगतच्या लोकवस्तीत माकडांच्या टोळ्या येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. फटाके वाजवून त्यांना जंगलात पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र तरीही माकडे पुन्हा परतत आहेत. नागरिक माकडाला जंकफूड खाऊ घालतात. असे पदार्थ खाण्याची सवय लागल्याने ती पुन्हा लोकवस्तीत येत आहेत.  – राजेंद्र पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, राष्ट्रीय उद्यान

First Published on September 10, 2019 3:27 am

Web Title: monkey riot in urban slums akp 94
Next Stories
1 शिळफाटा-महापे मार्गावर अवजड वाहतुकीस प्रवेशबंदी
2 पालिका आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणा!
3 डोंबिवलीतील खराब रस्त्यांबाबत हृदयनाथ मंगेशकरांचा संताप 
Just Now!
X