भिवंडी ग्रामीण पट्टय़ात अडीच हजारांहून अधिक रुग्ण

ठाणे : जिल्ह्याच्या शहरी भागांमध्ये वेगाने फैलावलेला करोना आता ग्रामीण भागांतही हातपाय पसरू लागला आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांत आतापर्यंत ५ हजार ६५३ जणांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे भिवंडी ग्रामीणमधील (२,६०८) आहेत. ग्रामीण भागात दररोज सरासरी दीडशे ते दोनशे रुग्णवाढ नोंदवली जात असून आतापर्यंत १३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे जिल्ह्यात आत्तापर्यंत ८० हजारांहून अधिक नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. सुरुवातीला जिल्ह्याच्या शहरी भागात पसरणारा करोनाचा संसर्ग आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पसरू लागला आहे. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर हे पाच तालुके ग्रामीण भागात मोडतात. या सर्वच तालुक्यांमध्ये करोनाचा शिरकाव झाला असून ठाणे ग्रामीणमध्ये दररोज सरासरी १५० ते २०० करोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे या पट्टय़ातील ५ हजार ६५३ नागरिकांना आत्तापर्यंत करोनाची लागण झाली असून त्यामध्ये भिवंडी तालुक्यातील सर्वाधिक २ हजार ६०८, कल्याण तालुक्यातील १ हजार ४७९, अंबरनाथ तालुक्यातील ७१२, शहापूर तालुक्यातील ६२३ आणि मुरबाड तालुक्यातील २३१ रुग्णांचा समावेश आहे. तर ग्रामीण पट्टय़ात आत्तापर्यंत १३७ करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये भिवंडी तालुक्यातील सर्वाधिक ७०, कल्याण तालुक्यातील ३४, शहापूर तालुक्यातील १९, अंबरनाथ तालक्यातील १९ आणि मुरबाड तालुक्यातील २ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील भिवंडी महापालिका क्षेत्रात एकीकडे रुग्णांचे प्रमाण आटोक्यात येत असले तरी भिवंडी शहराच्या आजुबाजूला असलेल्या दाट वस्तीच्या गावांमध्ये रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक वाढले असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. तर, या गावांमध्ये करोना रुग्ण दगावण्याचे प्रमाणही अधिक असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येबाबात ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता परिवहनच्या बस आणि इतर खासगी वाहनांची वाहतूक सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागात करोनाचा प्रसार वाढल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी ग्रामीण पट्टय़ात समूह संसर्ग नसल्याचा दावा अधिकारी करत आहेत.

सर्वेक्षणावर भर

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोना रुग्ण आढळल्यानंतर त्या ठिकाणाला तात्काळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले जाते. ग्रामीण भागातील पाच तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत ९२० ठिकाणांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्वेक्षण करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, आंगणवाडी सेविका आणि जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक यांचे मिळून एकूण १ हजार २१ पथके तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत ५२० प्रतिबंधित क्षेत्रांचे १४ दिवस सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

आकडेवारीचा गोंधळ

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दररोज किती रुग्णांच्या करोना चाचण्या होतात याची नेमकी आकडेवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. तसेच ग्रामीण भागात आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तात्काळ चाचणी करता यावी यासाठी प्रतिजन चाचण्यांची सुविधाही अद्याप ग्रामीण भागात उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांचा शोध घेण्यासाठी १४ दिवसांच्या सर्वेक्षणावरच भर दिला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.