सरासरी देयके पाठवण्यात आल्यामुळे गोंधळ

भाईंदर : करोनामुळे गेल्या दोन महिन्यापासून पूर्णत: बंद असलेल्या लघु औद्योगिक वसाहतींना सरासरीप्रमाणे हजारो रुपयांची वीज देयके पाठवण्यात आली असल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे कामधंदा बंद असताना ही देयके भरणार तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात करोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून पूर्णत: टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे मीरा-भाईंदर शहरातील असलेल्या हजारो लघु औद्योगिक वसाहती बंद अवस्थेत आहेत. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून एक ही युनिट वापरला नसला तरी हजारो रुपयांची वीज देयके वीज कंपनीकडून पाठवण्यात आल्यामुळे लघु उद्योग व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्याच प्रकारे वीज कंपन्यांना या विषयी कल्पना असतानादेखील त्यांनी ही देयके मुद्दाम पाठवले असल्याचे आरोप या कारखानदारनाकडून करण्यात येत आहे.

मीरा-भाईंदर शहरात मोठय़ा प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत. या औद्योगिक वसाहतीमुळे मीरा-भाईंदर महानगरपालिकेलादेखील मोठय़ा प्रमाणत आर्थिक फायदा उपलब्ध होतो. परंतु गेल्या अडीच महिन्यापासून पूर्णत: काम बंद असल्यामुळे या वसाहतीमधील कामगारांच्या अन्न पुरवठय़ात पालिकेमार्फत मदतदेखील करण्यात येत आहे. कामे बंद असल्यामुळे व्यवसायाचा कणा मोडलेल्या व्यापाऱ्यांना आता पुन्हा हजारो रुपयांची वीज देयके वीज कंपन्यांकडून पाठवण्यात आली असल्यामुळे टीका होत आहे.

विनावापर आकारणी

गेल्या दोन महिन्यांपासून एक ही युनिट वापरला नसला तरी हजारो रुपयांची वीज देयके वीज कंपनीकडून पाठवण्यात आल्यामुळे लघु उद्योग व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्याच प्रकारे वीज कंपन्यांना या विषयी कल्पना असतानादेखील त्यांनी ही देयके मुद्दाम पाठवले असल्याचे आरोप या कारखानदारनाकडून करण्यात येत आहे.

अशा प्रकारे देयके  पाठवणे हे योग्य नाही. त्यामुळे या वीज कंपनीकडून पुनर्विचार करून पुन्हा योग्य ती देयके पाठवण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत.

– रोहिदास पाटील, सभागृह नेते, मीरा-भाईंदर महानगरपालिका