वाहतूक पोलिसांतर्फे आयोजित शिबिरात छडा

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाणे वाहतूक पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान आणि नेत्र-कर्ण तपासणी शिबिरामध्ये ठाणे महापालिका परिवहन सेवेचे चालक आणि शासकीय वाहनांवर चालक म्हणून काम करणाऱ्या १३३ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ९९ जणांना नेत्रविकार असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला.

रस्त्यावरील अनेक अपघात हे वाहनचालकांच्या कर्ण आणि नेत्रविकारामुळे होत असतात. या पाश्र्वभूमीवर रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत टीएमटी, पोलीस कर्मचारी आणि शासकीय वाहनांवर काम करणाऱ्या चालकांच्या नेत्र, कर्ण तपासणीचे आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १३३ वाहन चालकांपैकी ९९ जणांना नेत्रविकारांनी ग्रासल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. यातील ३५ जणांना गंभीर स्वरूपाचे नेत्रविकार होते. वाहन चालकाला नेत्र आणि कर्णविकार असल्यास अपघाताचे प्रमाण अधिक असते. परिवहनसेवेतील चालकांना अशा स्वरूपाचे आजार असल्यास अपघात होऊ  शकतात आणि ते प्रवाशांच्या जिवावरही बेतू शकते. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी जिल्ह्य़ातील एसटी महामंडळाचे व्यवस्थापक तसेच सर्वच शासकीय आणि निमशासकीय विभागांना पत्र पाठविले असून त्यात सर्व कर्मचाऱ्यांचे नेत्र आणि कर्ण तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

या शिबिरात १०० पोलीस कर्मचारी आणि १० रिक्षाचालकांनी रक्तदान केले. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि आधार फाऊंडेशनचे या शिबिरास सहकार्य लाभले. या कार्यक्रमास पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. संतोष कदम उपस्थित होते.