कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असून जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा १०२ झाला आहे. कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक ३४ तर त्याखालोखाल नवी मुंबई २८ आणि ठाणे परिसरात २१ रुग्ण आहेत. मीरा-भाईंदरमध्येही करोनाबाधितांची संख्या १३ वर पोहोचली असून यामुळे या सर्वच शहरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये रविवार सायंकाळपर्यंत करोनाबाधितांची संख्या १९ होती. तर त्यातील एकाचा करोनामुळे नुकताच मृत्यू झाला. असे असतानाच रविवारी रात्री वृंदावन परिसरात एक तर सोमवारी नौपाडय़ातील खासगी रुग्णालयातील एका डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचे समोर आले असून यांमुळे ठाणे शहरातील करोनाबाधितांचा आकडा २१ इतका झाला आहे. वृंदावनमधील व्यक्ती दुबईत प्रवास करून आली होती तर नौपाडय़ातील त्या डॉक्टरने कळव्यातील करोनाबाधित रुग्णाची तपासणी केली होती. त्यामुळे या दोघांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने करोनाबाधित रुग्ण राहात असलेल्या इमारतीच्या पाचशे मीटरचा परिसर टाळेबंद केला आहे. तसेच या दोघांच्या कुटुंबीयांनाही विलगीकरण कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातही करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असून या क्षेत्रामध्ये रविवापर्यंत करोनाबाधितांची संख्या २८ होती. त्यात सोमवारी सहा नवीन रुग्णांची भर पडली असून त्यामुळे या क्षेत्रातील रुग्णांची संख्या ३४ झाली आहे. अंबरनाथ शहरात एक करोनाबाधित रुग्ण आढळून आला असून सोमवारी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यापूर्वी ८ जणांमध्ये लक्षणे आढळल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांना बाधा झाली नसल्याचे समोर आले होते. तर जवळपास २५ जणांना घरातच विलगीकरण करून ठेवण्यात आले होते. बदलापूर शहरातील एका वृद्धाश्रमात राहणाऱ्या मुलुंड येथील एका महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर उल्हासनगर महापालिका क्षेत्रात एक आणि ठाणे ग्रामीणमध्ये तीन करोनाबाधित रुग्ण आहेत. भिवंडीत एकही रुग्ण आढळून आला नसल्याने हा परिसर अद्यापही सुरक्षित असल्याचे चित्र आहे.

करोनाबाधित रुग्ण

ठाणे शहर                     २१

कल्याण-डोंबिवली         ३४

नवी मुंबई                      २८

मीरा-भाईंदर                  १३