रुग्णालयातील उपअधिष्ठात्यांसह १७३ जण बाधित; उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण

ठाणे : शहरातील करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच शहरातील आरोग्य यंत्रणाही आता करोनाच्या विळख्यात सापडू लागली आहे. महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील उपअधिष्ठत्यांसह वैद्यकीय अधिकारी, महिला कर्मचारी, तंत्रज्ञ, वॉर्डबॉय आणि सफाई कर्मचारी अशा १७३ हून अधिक जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या रुग्णालयात उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असून सुरक्षेची साधने उपलब्ध करून दिली जात नसल्याच्या तक्रारी कर्मचारी दबक्या आवाजात करू लागले आहेत.

ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे विविध असुविधांमुळे नेहमी चर्चेत येत असते. शहरात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाने या रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तयार केला आहे. इतर आजाराच्या रुग्णांसह करोनाबाधितांवर या रुग्णालयात उपचार केले जात असले तरी रुग्णालय व्यवस्थापन येथील कर्मचाऱ्यांना पुरेशी सुविधा देत नसल्याच्या तक्रारी येथील कर्मचारी दबक्या आवाजात करू लागले आहेत.

व्यवस्थापनाच्या या ढिसाळ कारभारामुळे रुग्णालयातील ४८ वैद्यकीय अधिकारी, ५२ महिला कर्मचारी, ३४ वॉर्डबॉय आणि इंटर्नशिपमधील १८ जण अशा एकूण १७२ जणांना करोनाची लागण झाली आहे. यासोबतच रुग्णालयातील एक उपअधिष्ठता यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यातील ४८ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी ३९ अधिकारी बरे झाले असून ९ जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच ५२ महिला कर्मचाऱ्यांपैकी ३८ जणींवर उपचार सुरू असून १४ महिला कर्मचारी करोनामुक्त झाल्या आहेत. तर, ३४ वॉर्डबॉयपैकी १४ जण बरे झाले असून २० जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच, इंटर्नशिपमधील १८ पैकी १७ जण बरे झाले असून त्यातील एकावर उपचार सुरू आहेत.

करोनाची भीती आणि कर्मचाऱ्यांची कमी झालेली संख्या यामुळे रुग्णालयातील शस्त्रक्रियांचे प्रमाणही कमी करण्यात आले असून केवळ महत्त्वाच्या आणि आपत्कालीन परिस्थितीत असणाऱ्या रुग्णांच्याच शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. रुग्णालयातील सर्व विभाग मिळून असलेल्या ७५० कर्मचाऱ्यांपैकी १७३ कर्मचारी करोनाच्या विळख्यात सापडल्याने त्यातील सध्या उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येऊ लागला आहे. त्यातच यापैकी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी केवळ कापडी मुखपट्टय़ा देण्यात आल्या आहेत.

रुग्णालयातील करोनाची लागण झालेले अनेक वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी करोनामुक्त झाले असून आता कामावर रुजू झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची रुग्णालय व्यवस्थापन काळजी घेत असून त्यांना सुरक्षेची साधने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचीही व्यवस्थापन आणि कर्मचारी विशेष काळजी घेत आहेत.

– डॉ. प्रतिभा सावंत,

अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा