महापालिकेचा प्रस्ताव; नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा मिळणार

ठाणे शहरातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून महापालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी शहरातील दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ‘आपला दवाखाना’ सुरू केला असून त्यास नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन प्रशासनाने आता शहरात ५० ठिकाणी अशाच प्रकारचे दवाखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना आता विनामूल्य आरोग्य सुविधा मिळणार आहेत. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने तयार करून येत्या १९ जूनला होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी आरोग्य विभागाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाकडून दिल्लीच्या धर्तीवर ‘आपला दवाखाना’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यासाठी शिवाजीनगर आणि खारेगाव या भागात प्रायोगिक तत्त्वावर आपला दवाखाना सुरू करण्यात आला असून या ठिकाणी नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या दवाखान्यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळेच महापालिका प्रशासनाने आता शहरात आणखी ५० ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २६ लाखांच्या घरात असून त्यापैकी ५२ टक्के लोक हे झोपडी आणि चाळीमध्ये वास्तव्य करतात. शहरातील नागरिकांसाठी महापालिकेची २७ आरोग्य केंद्र आहेत. एक ते दीड लाख लोकसंख्येसाठी एक आरोग्य केंद्र आहे. मात्र ३० ते ४० हजार लोकसंख्येसाठी एक आरोग्य केंद्र असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरात ५० ठिकाणी ‘आपला दवाखाना’च्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत, असे प्रशासनाने म्हटले आहे.

२८ कोटींचा भार

दवाखाना उभारणीचा खर्च, त्या ठिकाणी लागणारी उपकरणे, साहित्य आणि जागा भाडय़ाने घेणे, हा खर्च संबंधित संस्थेला करावा लागणार आहे. एक ‘आपला दवाखाना’ सुरू करायचा असेल तर त्याच्या निर्मितीसाठी ४३ लाख ४७ हजार रुपये खर्च अपेक्षित असून हा सर्व खर्च नियुक्त संस्थेमार्फत केला जाणार आहे. या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांच्या वैद्यकीय तपासणी आणि औषधांचा खर्च महापालिका करणार असून त्यासाठी महापालिकेवर वर्षांकाठी २८ कोटी २३ लाख ६० हजार इतका भार पडणार आहे. प्रतिदिन शंभर रुग्ण तपासणीसाठी येतील असे ग्राह्य़ धरण्यात आले आहे.