भाईंदर : करोनामुळे मीरा-भाईंदर शहरातील शाळा अद्यापही सुरू करण्यात आलेल्या नाहीत. मात्र पालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याकरिता पालिका प्रशासनाने गेल्या सात महिन्यात कोणत्याच स्वरूपाची नवी योजना आखली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थी हे अद्यापही  शिक्षणापासून वंचित असल्याची बाब पार पडलेल्या महासभेत समोर आली.

शहरात महानगरपालिकेच्या एकूण ३६ शाळा असून त्यात मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार १७० इतकी आहे. करोना संकटामुळे  डिजिटल माध्यमांतून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे.  महानगरपालिकेची महासभा शुक्रवारी पार पडली. या महासभेत पालिका शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांंकरिता विविध वस्तू उपलब्ध करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावेळी सद्य:स्थितीत लहान मुलांच्या शिक्षणाकरिता  पालिकेमार्फम्त कोणत्या उपाययोजना आखण्यात आल्या अशी विचारणा नगरसेविका मर्लिन डिसा यांनी केली. त्यावर उत्तर देताना शिक्षण अधिकारी उर्मिला पारधे यांनी सांगितले की, पालिका शाळेत एकूण ६१७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी  मोबाइल फोन नसलेल्यांची संख्या ७०० आहे, तर १९६७ विद्यार्थ्यांंकडे साधे फोन आहे. दूरदर्शनद्वारे  २५०५ शिक्षण घेत आहेत. त्याचप्रकारे २१६६ विद्यार्थ्यांंकडे अँड्रॉइड फोन असल्यामुळे त्यांना झूम आणि व्हॉट्सअ‍ॅप द्वारे शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र शिक्षण अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली ही माहिती सहा महिन्यांपूर्वी लोकसत्ता वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याकरिता कोणत्याही स्वरूपाच्या उपाययोजना आखण्यात आल्या  नसल्याचे आरोप नगरसेवकांनी केले.

वंचित विद्यार्थ्यांंना शिक्षण देण्याकरिता  शासनाकडून टीव्हीमाध्यमातून वर्ग घेण्यात  येतात, त्यामुळे  विद्यार्थ्यांंचे शिक्षण त्या माध्यमातूनच पूर्ण केले जात आहे.

उर्मिला पारधे, शिक्षण अधिकारी