५०० पेक्षा अधिक माशांच्या प्रजातींचे प्रदर्शन; शंभरहून अधिक फिशटँक
समुद्राच्या अंतरंगातील रंगीबेरंगी मत्स्य जीवनाविषयी सगळ्यांना प्रचंड कुतूहल असते. ठाणेकरांना हे कुतूहल शमवण्यासाठी मुंबईतील मत्स्यालय गाठावे लागत असते. ही अडचण लक्षात घेऊन ठाण्यातील ‘लौकिक क्रिएशन’ संस्थेच्या वतीने दुर्मीळ मत्स्य प्रजातींचे दर्शन घडवणाऱ्या ‘अ‍ॅक्वा लाइफ’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये देशातील विविध भागांमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा ठाण्यात हे प्रदर्शन दाखल होत आहे. ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयात २६ ते २९ मे दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ वाजता या वेळेत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्य़ाला विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला असून या भागातील खाडीमध्ये मोठय़ा प्रमाणात जैवविविधता उपलब्ध आहे. मात्र सागरातील हे दुर्मीळ आणि रंगीत मस्यजीवन पाहण्यासाठी आवश्यक सुविधामात्र इथे उपलब्ध नाहीत. हे लक्षात घेऊन लौकिक क्रिएशन संस्थेच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात १०० हूनही अधिक फिश टँक असणार आहेत. त्यात ५००च्या वर माशांच्या प्रजाती प्रदर्शन मांडले जाणार आहे. त्यांत ट्रिगर फिश, लायन फिश, पिवळ्या शेपटीचे डॅमसेल्स, निळे डॅमसेल्स, स्टिंग रे, माता टँग, ग्रीन विंग सार्जंट, मून रेस, चेकर बोर्ड रेस, सोनेरी डोक्याचा गोबी, मूरीश आयडॉल, व्हीम्पल, ब्लूरिंग एंजल, कुराण एंजल, ब्राऊन इल, क्लाऊन फिश, स्टोन फिश, बॅट फिश, फायर क्लाऊन आणि यलो बटरफ्लाय या मत्स्य जातींचा समावेश या प्रदर्शनात आहे.
मत्स्यप्रेमींना या प्रदर्शनात माशांच्या दुर्मीळ प्रजाती पाहायला मिळणार आहेत. त्यांत फ्रान्टोसा, जिओफेगस, पँटानो बँडेड लेपोरीनस, रॉटकिएल सेवरम्स, सँटानोपेरेका, पोल्लेनी, व्हीएजा रीगेन, अ‍ॅलीगेटर गार, अ‍ॅरोप्रियाना, ग्रे जायंट गुरामी, शॉवेल नोज कॅटफीश, टू रेड अ‍ॅरोवाना, ब्लॅक घोस्ट आणि इतरही दुर्मीळ आकाराच्या माशांचे दर्शन घेता येणार आहे.
प्रदर्शनात जलजीवनाबद्दलची शास्त्रोक्त माहिती मत्स्यप्रेमीपर्यंत पोहचवण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवकांची नियुक्ती प्रदर्शनाच्या ठिकाणी केली जाणार आहे. हे प्रदर्शन गेल्या सहा वर्षांपासून देशातील विविध भागांत मांडण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी या प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी उन्हाळी
सुट्टीचे औचित्य साधून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनातून दुर्मीळ अशा मत्स्य जातींबद्दल तसेच इतरही प्राण्यांबद्दल रसिकांमध्ये असलेली जिज्ञासा आणि कुतूहल शमविणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याशिवाय युवकांमध्ये समुद्रजीवनाबद्दल प्रेम निर्माण करणे, हा यामागचा हेतूही असून या निमित्ताने तो साध्य होऊ शकेल.
– लौकिक सोमण, लौकिक क्रिएशन्स.

प्रदर्शनासाठी ७० रुपये प्रवेश शुल्क आहे.
संपर्क – ९०९६००३३००/ ९४०४६८३४०७.