जिल्ह्यत साडेसात लाखांहून अधिक जण प्रतीक्षेत

ठाणे : केंद्र आणि राज्य सरकारने आखलेल्या पहिल्या तीन टप्प्यांत मोठय़ा उत्साहाने घराबाहेर पडून लसीकरण करून घेणाऱ्या नागरिकांना दुसरी मात्रा मिळवताना मात्र वणवण फिरावे लागत आहे. ठाणे जिल्ह्य़ात साडेसात लाखांपेक्षा अधिक नागरिक लसीकरणाची दुसरी मात्रा कधी आणि कुठे मिळेल या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. दुसरी मात्रा मिळविण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची सक्ती जवळपास सर्वच शहरांमध्ये करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाला पुरेशा प्रमाणात लशींचा पुरवठा होत नसल्याने संपूर्ण जिल्ह्य़ात कोव्हिशिल्डचे ७ लाख १६ हजार ७०२ तर कोव्हॅक्सिनचे ४६ हजार ८०७ असे एकूण ७ लाख ६३ हजार ५०९ नागरिक लसीकरणाच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे जिल्ह्य़ात आतापर्यंत १३ लाख ३४ हजार ७७९ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली आहे. यापैकी १२ लाख १२ हजार ९८० नागरिकांनी कोव्हिशिल्ड, तर १ लाख २१ हजार ७९९ नागरिकांनी कोव्हॅक्सिन लशीची पहिली आणि दुसरी मात्रा घेतली आहे. असे असले तरी त्यापैकी ७ लाख ६३ हजार ५०९ नागरिक दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत आहे. ठाणे जिल्ह्य़ातील लसीकरण केंद्रांवर यापूर्वी रांगा लावून नागरिक लस घेत होते. मे महिन्यापासून केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्य़ातील लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी ऑनलाइन पूर्वनोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. त्यातही कोव्हिशिल्ड लशीचा तुटवडा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून अनेक केंद्रे बंद असल्याचे चित्र आहे.

कोव्हॅक्सिन लशीचा साठा उपलब्ध असून त्यात दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्याऐवजी १८ ते ४४ वयोगटाच्या पहिल्या मात्रेसाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार वापरले जात आहेत. दुसरा डोस मिळत नसल्याने आणि त्याची कालमर्यादा संपत आल्यामुळे ज्येष्ठांमध्ये अस्वस्थता वाढू लागली असून त्यांच्याकडून केंद्रावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाण्यातील शुभा घोष यांनी २ एप्रिलला कोव्हिशिल्ड लशीची पहिली मात्रा घेतली. ४५ दिवसानंतर दुसरी मात्रा घ्यायचा असल्यामुळे ऑनलाइनद्वारे दिवस आणि वेळेची नोंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र कोणत्याच लसीकरण केंद्रावर दिवस आणि वेळ शिल्लक मिळत नसल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.

ठाण्यातील योगेश गांगुर्डे यांनी सांगितले, ‘माझ्या आई-वडिलांनी महिन्याभरापूर्वी कोव्हिशिल्डची पहिली मात्रा घेतली होती. त्यामुळे दुसऱ्या मात्रेसाठी ऑनलाइनवर नोंदणी करण्याचा प्रयत्न गेल्या तीन ते चार दिवसांपासून करत आहे. पण त्यावर दिवस आणि वेळच मिळत नसल्याने दुसरी मात्रा मिळेल की नाही याची चिंता आहे. उल्हासनगरमधील मंजु सजनानी यांनी सांगितले, ‘लसीकरणासाठी नोंदणी केली होती. मात्र नोंदणी होऊनही केंद्रावर लस मिळाली नाही. लशीची मात्रा संपल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र ती कधी मिळेल किंवा त्यासाठी काय करावे लागेल, याबाबत माहिती दिली जात नाही. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.’

लसीकरण विनाअडथळा

सोमवारी ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये प्रत्येकी दोन केंद्रे सुरू होती. त्यापैकी ठाण्यात दोन्ही ठिकाणी १८ ते ४४ वयोगटासाठी तर कल्याण-डोंबिवलीमध्ये एका केंद्रावर १८ ते ४४ आणि दुसऱ्या केंद्रावर दुसरी मात्रा दिली जात होती. भिवंडी तीनपैकी दोन केंद्रांवर १८ ते ४४ आणि एका केंद्रावर दुसऱ्या मात्रेसाठी खुले होते, तर उल्हासनगर शहरात सध्या महापालिकेच्या पाच केंद्रांवर लसीकरणाची मोहीम सुरू आहे. यातील मिडटाऊन रोटरी क्लब आणि उल्हासनगर ४ची शाळा क्रमांक १४ येथे १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी कोव्हॅक्सिनची एकूण ३०० मात्रा उपलब्ध होती. तर इतर तीन ठिकाणी ४४ वयोगटावरील कोव्हिशिल्डचे ४०० जणांचे लसीकरण सुरू होते. अंबरनाथ शहरात डॉ. छाया रुग्णालयात २०० कोव्हिशिल्डची मात्रा उपलब्ध असल्याने लसीकरण सुरळीत सुरू होते, तर आयुध निर्माण संस्थेत १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी कोव्हॅक्सिनची ४०० मात्रा उपलब्ध असल्याने लसीकरण सुरू होते. बदलापूर शहरात चार लसीकरण केंद्रांवर एकूण ३०० कोव्हिशिल्डची मात्रा उपलब्ध होती. त्यामुळे सोमवारी लसीकरण विनाअडथळा सुरू होते.

अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेणाऱ्यांसाठी दुसऱ्या मात्रेचा साठा राखून ठेवला होता. पण, केंद्र शासनाने तो वापरण्यास सांगितला आणि आता नवीन साठा केंद्राकडून मिळत नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुसरी मात्रा मिळत नसल्यामुळे नागरिक हवालदिल झाले असून स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.  कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा नागरिकांना मिळावी यासाठी योग्यप्रकारे नियोजन करण्यात आले आहे.

– नरेश म्हस्के, महापौर, ठाणे

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.