ठाणे शहरात सहा हजारांहून अधिक रुग्ण; साडेचार हजारांहून अधिक जणांवर घरीच उपचार

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या चार दिवसांत रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने पालिका तसेच खासगी करोना रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जागाच शिल्लक नसल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. प्रत्यक्षात मात्र शहरात करोनाचे सहा हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण असले तरी त्यापैकी केवळ एक हजार ३५० रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर उर्वरित चार हजार सातशेहून अधिक रुग्ण घरीच उपचार घेत असल्यामुळे पालिका आणि खासगी रुग्णालयांतील १ हजार २७४ खाटा रिकाम्या आहेत. त्यामध्ये अतिदक्षता विभागातील १३९, तर व्हेंटिलेटरच्या १८८ खाटांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात दररोज सरासरी सातशे ते आठशे रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी दिवसभरात ९३२ रुग्ण आढळून आले. रुग्णवाढीमुळे शहरातील पालिका आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी जागाच शिल्लक नसल्याची चर्चा सुरू झाली असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्षात मात्र शहरात रुग्ण वाढले असले तरी रुग्णालयातील खाटा रिकाम्याच आहेत. शहरात पालिका आणि खासगी अशी एकूण २१ करोना रुग्णालये आहेत. त्यामध्ये एकूण २ हजार ६०२ खाटा उपलब्ध आहेत. त्यापैकी १ हजार ३५० खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत, तर उर्वरित १२७४ खाटा रिकाम्या आहेत, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. शहरात करोनाचे ६ हजार १२७ सक्रिय रुग्ण असले तरी त्यातील साडेचार हजारांहून अधिक रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे असे रुग्ण घरीच तसेच पालिकेच्या विलगीकरण उपचार घेत असल्याने पालिका आणि खासगी खाटा रिकाम्या असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.

ठाणे शहरात रुग्ण वाढल्याने पालिका तसेच खासगी करोना रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याची अफवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. लक्षणे नसल्यामुळे अनेक रुग्ण घरीच तसेच विलगीकरण कक्षात उपचार घेत असून यामुळे पालिका आणि खासगी रुग्णालयांत आवश्यकतेनुसार खाटा उपलब्ध आहेत. रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर आणखी खाटांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महामार्गालगतच्या वाहनतळांमध्ये १२०० पैकी ४०० खाटा उपचारासाठी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

रुग्णालयांतील उपलब्ध खाटा

खाटांचे प्रकार               एकूण खाटा संख्या       शिल्लक खाटा

साध्या खाटा                                  १०९२          ८६९

ऑक्सिजन खाटा                        १०७०             २६६

अतिदक्षता विभागातील खाटा      ४४०               १३९

व्हेंटिलेटर खाटा                           १४०               ११८

एकूण                                         २६०२             १२७४