26 January 2021

News Flash

जनआरोग्य योजनेत ३१ हजारांहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत १०९ रुग्णालयांकडून आरोग्य सेवा

(संग्रहित छायाचित्र)

आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ांत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या तीन जिल्ह्यांमधील १०९ खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये ही योजना राबविण्यात आली असून या योजनेत गेल्या आठ महिन्यांत ३१ हजार ९२५ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. या योजनेचा सर्वाधिक लाभ मूत्रपिंड रोग आणि कर्करोगाच्या रुग्णांना झाल्याची माहिती समोर आली आहे.

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जन आरोग्य या दोन्ही योजना राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी कोकण विभागातील ठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यांचे मिळून एक क्षेत्रीय कार्यालय आहे. पिवळी आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेमध्ये विविध आजारांनुसार विम्याची रक्कम ठरविण्यात आली आहे. योजना राबविल्या जाणाऱ्या रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर शिधापत्रिका आणि ओळखपत्र जमा करून घेतले जाते. त्यानंतर रुग्णावर उपचार करण्यात येतात. या उपचाराची माहिती राज्य आरोग्य सोसायटीचे अधिकारी तसेच कर्मचारी घेतात. तसेच रुग्णावर खरोखरच उपचार झाले आहे की नाही, याचीही खातरजमा करतात. त्यानंतरच सोसायटीमार्फत रुग्णालयाला उपचाराचे पैसे अदा करण्यात येतात. ही सर्व प्रक्रिया रुग्णालय, आरोग्य हमी सोसायटी व विमा कंपनी यांच्यामार्फत पार पडते.

करोनाकाळात शासकीय रुग्णालयांचे करोना रुग्णालयात रूपांतर केल्यामुळे या योजनेत समाविष्ट असणाऱ्या आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे खासगी आणि सरकारी मिळून ठाणे जिल्ह्यात ६८, पालघर जिल्ह्यात १९ आणि रायगड जिल्ह्यात २२ रुग्णालये आहेत. या तीनही जिल्ह्यांतील १०९ रुग्णालयांमध्ये १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या काळात कर्करोग, मूत्रपिंड रोग, स्त्रीरोग, हाडांच्या शस्त्रक्रिया अशा विविध आजारांच्या ३१ हजार ९२५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ७ हजार ६१६, तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील २४ हजार ३१२ रुग्णांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांच्या उपचारासाठी ६१ कोटी ४३ लाखांचा खर्च आला असून ही रक्कम राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत संबंधित रुग्णालयांना देण्यात आली आहे.

रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत जनआरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या योजनांसंदर्भात नागरिकांना संपूर्ण माहिती देण्यात येत असून रुग्णांना येणाऱ्या अडचणी  सोडविण्यात येत आहेत. केशरी, पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.

– डॉ. वैभव गायकवाड, क्षेत्रीय व्यवस्थापक, जनआरोग्य योजना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2020 1:56 am

Web Title: more than thirty one thousand paients got treatment in public health scheme dd70
Next Stories
1 उद्योजकांपुढे खंडणीखोरांचे संकट
2 अंबरनाथ, बदलापुरात चाचण्या वाढणार
3 ठाणे स्थानकात रिक्षाचालकांची मुजोरी
Just Now!
X