दर रविवारी डोंबिवलीत महिलांचा फेरफटका

मॉर्निग वॉकमुळे आरोग्य उत्तम राहत असल्याने प्रत्येकाने सकाळी एक तास तरी चालावे, असा सल्ला डॉक्टर नेहमीच देतात. परंतु हे न करण्याची कारणे प्रत्येकाकडे असतात. त्यातही महिला घरच्या कारणांमुळे सकाळी फिरायला बाहेर पडण्याबाबत असमर्थता व्यक्त करत असतात. डोंबिवलीतील काही महिलांनी एकत्र येत त्यावर उपाय शोधला आहे. आठवडय़ाच्या इतर दिवशी शक्य नसले तरी महिलांना किमान रविवारी सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडावे, म्हणून ऊर्जा फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.

दर रविवारच्या या सामूहिक रपेटीतून महिलांचे आरोग्य उत्तम राहिल, शिवाय एकत्र आल्याने त्यांच्यात विचारांची देवाणघेवाणही होईल, हा उद्देश आहे. ऊर्जा फाऊंडेशनच्या वतीने ‘रविवार स्पेशल मॉर्निग वॉक’ हा उपक्रम रविवार, २४ जानेवारीपासून सुरू होत आहे. सकाळी ६ वाजता मानपाडा रोडवरील चार रस्ता येथून सुरू होऊन घरडा सर्कल येथे ही प्रभातफेरी संपेल.

नोकरदार महिला शहरात जास्त असल्याने त्यांना दररोज सकाळी चालायला जमत नाही. त्यामुळे त्यांनी किमान सुटीच्या दिवशी सकाळी घराबाहेर पडून एक ते दोन किलोमीटर अंतर चालावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करीत आहोत. काही महिला नियमाने सकाळी चालायला जातात. मात्र एकटय़ा-दुकटय़ाने चालणे त्यांना कंटाळवाणे वाटते. त्यामुळे मानपाडा चार रस्ता येथून सहा वाजता सामूहिकपणे चालत घारडा सर्कल येथे येतील. तिथे त्यांनी दहा-पंधरा मिनिटे एकमेकींशी हितगुज करणे अपेक्षित आहे.

स्नेहल दीक्षित.

या ठिकाणी महिलांना प्राणायाम, योगासनेही शिकविण्यात येतील. एकत्र जमल्याने महिलांना एकमेकींचे विविध उपक्रम, संकल्पना समजतील. मात्र चालताना कुणीही एकमेकांशी बोलणार नाहीत. घरडा सर्कल येथे पोहोचल्यानंतरच त्यांच्यातील संवाद घडेल.

लीना ओक-मॅथ्यू.