पावसाच्या विश्रांतीनंतर दीड दिवस उलटूनही इमारतींभोवती पाणी

वसई : वसई विरार भागात शुक्रवारपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी सकाळी विश्रांती घेतली. पावसाच्या विश्रांतीनंतर दीड दिवसांचा कालावधी उलटूनही वसई-विरार भागातील बहुतेक भागात पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

मागील काही दिवसांपासून जोरदार पडणाऱ्या पावसामुळे वसई-विरार भागात यंदाही पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या भागातील जनजीवन दोन दिवस विस्कळीत झाले होते. शहराच्या विविध भागांत मोठय़ा प्रामाणात पाणी भरले असल्याने नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस जरी थांबला असला तरी शहराच्या विविध भागांत साचलेल्या पाण्याचा अद्यापही निचरा न झाल्याने बहुतेक भाग अजूनही पाण्याखाली आहेत.

यंदाच्या वर्षी पूरस्थिती निर्माण होऊ  नये यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, पंरतु या मुसळधार कोसळणाऱ्या पावसापुढे त्यादेखील फोल ठरल्या आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग असूनही अजूनही पाण्याचा निचरा होत नसल्याने वसई-विरार भागातील नागरिकांनी पालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. मागील वर्षांपेक्षा कमी प्रमाणात पाऊस होऊनदेखील पूरजन्य परिस्थिती निर्माण होत असेल तर याला जबाबदार कोण, असा सवालदेखील नागरिकांनी केला आहे.

वसई-विरारमधील नालासोपारा पश्चिमेतील डेपो परिसर, विजयनगर  सनसिटी, एव्हरशाईन रस्ता, वसईतील सी कॉलनी, अंबाडी रोड येथील कृष्णा टाऊनशिप, विद्यामंदिर मार्ग, लाभ कॉम्प्लेक्स, कल्पना लाईफलाईन रुग्णालय परिसर व इतर भागांतदेखील मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. या भागात पाणी साचल्यामुळे वसई-विरारकरांचे हाल झाले असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या ज्या भागात पाणी भरले आहे, अशा भागातील पाण्याचा निचरा होण्यासाठी पालिका प्रशासनाच्या पंपाच्या साहाय्याने पाणी काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना काही भागांत हे पंप लावण्यात आले नसल्याने हे पाणी भरून राहिले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. वसई-विरार भागातील नागरिकांची गंभीर स्थिती असतानादेखील पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शिवसेना वसई शहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी सांगितले आहे. पाऊस थांबल्यानंतर प्रत्येक विभागाची पाहणी करून त्या भागात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला का नाही याची पाहणी करणे गरजेचे होते, मात्र असे असतानादेखील याकडे लक्ष न दिल्याने बहुतेक भागात दीड दिवसांनंतर पाणी जैसे थे असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे.

मालमत्तांचे नुकसान

चार दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे वसई-विरार भागातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते. त्यामुळे घरामध्ये असलेल्या वस्तू यांचे मोठय़ा प्रामाणात नुकसान झाले, त्याचबरोबर काही भागांत वाहनेदेखील पाण्याखाली गेल्याने अनेक वाहनेदेखील बंद पडल्याने वाहनांचेदेखील मोठे नुकसान झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

रोगराईची भीती

मागील वर्षी जुलै महिन्यात वसईत अशीच पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर बरेच दिवस पाणी साचून राहिले होते. आताही पाऊस ओसरल्यानंतर शहरातील पाण्याचा निचरा झालेला नाही. यामुळे पुन्हा एकदा शहरात साथीचे तसेच इतर आजार पसरण्याची भीती निर्माण झालेली आहे. मागील वर्षी पुरानंतर वसईत डेंग्यूची मोठी साथ पसरली होती. यामुळे वसईकर धास्तावले आहेत. पावसाचे पाणी जलवाहिन्यात तसेच पाण्याच्या टाकीत शिरले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.