डोंबिवली येथील शिवमंदिर परिसरातील गिरनार चौकात बुधवारी पहाटे भरधाव कारने पदपथावर झोपलेल्या मायलेकींना चिरडल्याची घटना घडली असून यात दोघींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी कारचालक इक्बाल शेख (२४) याला रामनगर पोलिसांनी अटक केली असून तो दारूच्या नशेत कार चालवीत होता, अशी माहिती पुढे आली आहे.

ठाकुर्ली येथील मोठागाव परिसरात इक्बाल शेख राहतो. तो बुधवारी पहाटे गिरनार चौकातून इनोव्हा कार भरधाव वेगाने घेऊन जात होता. त्या वेळी समोरून आलेल्या स्कोडा कारला धडक देऊन त्याच्या कारने एका भिंतीचा कठडा तोडला. त्यानंतर पदपथावर झोपलेल्या मीनाकुमारी (३५) व तिची मुलगी पुष्पा (८) या मायलेकींना कारच्या चाकाखाली चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, गाढ झोपेत असलेल्या या दोघी मायलेकींचा जागीच मृत्यू झाला. तसेच या अपघातात स्कोडा कारचालक जस्टीन जोस (३५) हे जखमी झाले असून रुग्णालयात उपाचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. या प्रकरणी जस्टीन यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इक्बाल शेख याला अटक करण्यात आली असून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. इक्बाल चालवीत असलेली कार एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या मालकीची असल्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती.

तिचे शिक्षणाचे स्वप्न अधुरेच..
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मीनाकुमारी या भिक्षा मागत होत्या आणि त्यातूनच त्या मुलीचे पालनपोषण करीत होत्या. भिक्षा मागत असल्याने दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न त्यांच्यापुढे होता. आपल्या मुलीने आपल्याप्रमाणे भिक्षा मागू नये म्हणून त्या तिला शिक्षण देण्यासाठी धडपड होत्या. पालिकेच्या शाळेमध्ये पुष्पा शिक्षण घेत होती आणि तिलाही शिक्षण घेऊन मोठे व्हायचे होते; परंतु या अपघातामुळे त्यांची स्वप्ने अधुरेच राहिल्याचे तिच्या सहकाऱ्यांनी सांगितले.