भावाशी भांडण झाले आणि रागावून घर सोडले

आठ वर्षांची असताना घरातून बेपत्ता झालेली एक मुलगी चक्क दहा वर्षांनी आपल्या आईला भेटली. आईला पाहताच ती बिलगली आणि आनंदाश्रूंनी वाट मोकळी केली. या माय-लेकींच्या अनपेक्षित भेटीने आकाशच ठेंगणे झाल्याची आनंदायी घटना वाशी येथे घडली. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ही भेट घडवून आणली.

वाशी येथे अनिता पाटील ही मुलगी आई आणि दोन भावांसह एका झोपडपट्टीत राहात होती. तिची आई इतर घरांत धुणीभांडीचे काम करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवत होती. दहा वर्षांपूर्वी तिचे भावाशी भांडण झाले. तेव्हा अनिता जेमतेम आठ वर्षांची होती. त्या अजाण वयात ती घरातून रागावून बाहेर पडली आणि रस्ता चुकली. वाट चुकलेली अनिता एका व्यक्तीला सापडली.

त्या व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली, परंतु अनिताला आपल्या घरचा पत्ता काही सांगता येत नव्हता. पोलिसांनी खूप शोध घेतला, पण अनिताची आई काही सापडली नाही. त्यामुळे तिला भिवंडीच्या सुधारगृहात पाठविण्यात आले. अनिता घर सोडून गेल्याने तिच्या आईचा जीवच कासावीस झाला होता. तिने पोलीस ठाण्यात तक्रार केली. मुलीच्या शोधासाठी तिची आई वणवण भटकत होती, परंतु त्या मातेची आपल्या मुलीशी भेट होऊ  शकली नाही.

अनिताच्या कुटुंबीयांचा शोध लागत नसल्याने तिची नियमाप्रमाणे पुढील पालनपोषणासाठी विरारच्या संजीवनी होम्स या आश्रमशाळेत रवानगी करण्यात आली. आश्रमात अनिता रुळली, पण आईच्या आठवणीने तिचे मन व्याकूळ होत होते. या आश्रमात अनेक मुली होत्या. त्यांच्यासोबत ती शिक्षण घेऊ  लागली. या आश्रमात मुलींना विविध व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवून त्यांना स्वावलंबी बनविले जाते. त्यानुसार अनिताने बेकरी प्रॉडक्टचे शिक्षण घेतले होते.

अनिता १८ वर्षांची झाली आणि आश्रमाचा निरोप घ्यायची वेळ झाली. आश्रमाचे संचालक फादर व्हिक्टर यांनी पुन्हा एकदा अनिताला तिच्या आईकडे पोहोचविण्यासाठी शोध घ्यायचे ठरवले. वाशीच्या कुठल्यातरी मार्केटजवळ आपली वसाहत होती, एवढेच अनिता सांगू शकत होती.

फादर व्हिक्टर यांनी त्या ठिकाणी जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. परंतु निराश न होता त्यांनी पुन्हा प्रयत्न केला. या वेळी फादर व्हिक्टर यांना ते मार्केट सापडले. सुदैवाने तेथील एक व्यक्ती अनिताच्या आईला ओळखत होती. त्याने तिच्या नव्या घराचा पत्ता दिला.

आईला पाहताच अनिता बिलगली आणि माय-लेकींच्या भेटीने उपस्थित सारेच भारावले. दहा वर्षांनी मुलगी परत आल्याने अनिताच्या आईला स्वर्गीय सुखाची अनुभूती झाली.

 

अनिता आमच्या आश्रमात आली तेव्हा तिने अनिता पाटील एवढेच नाव सांगितले होते.  इतक्या वर्षांत आम्हीही तिची आई कधी भेटेल ही आशा सोडली होती. आश्रमातून तिला निरोप देण्यापूर्वी आम्ही पुन्हा प्रयत्न केले. आमच्या प्रयत्नांना नशिबाने साथ दिली आणि अनिता पुन्हा आपल्या आईला भेटू शकली

– फादर व्हिक्टर, संचालक संजीवनी होम्स