भिवंडीजवळील घटना; खड्डे कारणीभूत असल्याची चर्चा

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडीजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वारासह त्याच्या आईचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. बेबीबाई काकडे (४८) आणि नितीन काकडे (२८) अशी मृतांची नावे आहेत. महामार्गावरील खड्डयांमुळे हा अपघात झाल्याची चर्चा आहे. मात्र, त्यास पोलिसांकडून दुजोरा मिळू शकला नाही.

भिवंडी येथील आमनेपाडा भागात बेबीबाई आणि नितीन हे राहत होते. ते गुरुवारी सकाळी पूर्णा येथील नातेवाईकांकडे गणेशदर्शनासाठी गेले होते. तिथून दुपारी ४ च्या सुमारास घरी परतत असताना मुंबई-नाशिक महामार्गावर भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात बेबीबाई यांच्या डोक्याला आणि नितीन यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांना जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मुंबई -नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हा अपघात खड्ड्यांमुळे झाल्याची चर्चा शहरात दिवसभर सुरू होती. मात्र, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.