आईला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलगा व सून या दोघांविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आईला मिळणारे खोलीचे भाडे आणि वयोवृद्धपणामुळे सांभाळण्यास होणाऱ्या त्रासाबद्दल वारंवार छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दोघांवर आरोप आहे.

इंदूबाई कदम असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून तिच्या आत्महत्येप्रकरणी मुलगा प्रवीण कदम आणि सुन सुनीता या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे येथील शास्त्रीनगर भागातील प्रवीण कदम हा आपल्या कुटूंबासोबत राहतो. त्याची आई इंदूबाई या त्याच्यासोबत राहत होत्या.

२१ डिसेंबर २०१७ रोजी इंदूबाई यांनी राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. त्यात जखमी झाल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना २५ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यु झाला. दरम्यान, इंदूबाई यांची मुलगी प्रभा कृष्णन अय्यर हिने वर्तकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यामध्ये प्रविण आणि सुनीता या दोघांनी इंदूबाई यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.

इंदूबाई यांना मिळणारे खोलीचे भाडे आणि वयोवृद्धपणामुळे सांभाळण्यास होणाऱ्या त्रासाबद्दल वारंवार छळ करून या दोघांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.