माहेरी गेलेल्या पत्नीला घरी परत आणण्यास नकार देत असल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणानंतर एका तरुणाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री कल्याणमधील भोईवाडा येथे घडली.

रुक्साना मेहमूद खान (६२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून या हत्येप्रकरणी तिचा मुलगा अमान हसन मुल्ला (२८) याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. अमानची पत्नी इफरा गरोदर असल्यामुळे तिला माहेरी पाठवण्यात आले होते. तिला पुन्हा घरी आणण्याचा आग्रह अमानने आईकडे धरला होता. मात्र त्यांनी याला विरोध केल्यामुळे दोघांत भांडण झाले. याच रागातून त्याने हातात मिळेल ती वस्तू घेऊन रुक्साना यांना मारहाण केली. या मारहाणीतच रुक्साना यांचा मृत्यू झाला.