ठाण्याच्या नेहरूनगरमध्ये तिघांना अटक
ठाणे येथील नेहरूनगर भागात रस्त्यावर उभ्या असलेल्या चार दुचाकींची जाळपोळ करीत तेथून पलायन करणाऱ्या त्रिकुटाला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. या त्रिकुटांपैकी एक जण नेहरूनगर भागात रात्री उशिरा प्रेयसीसोबत बोलत असताना एका व्यक्तीने त्याला हटकले होते. या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याने त्या व्यक्तीला धडा शिकविण्यासाठी हा प्रकार केल्याची बाब तपासात पुढे आली आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील नागरिक परिसरातील रस्त्यावरच दुचाकी उभी करतात. याच भागातील एका गल्लीबाहेरील रस्त्यावर दररोज रात्री ६० ते ७० दुचाकी उभ्या असतात. या दुचाकींवर पेट्रोल टाकून त्यांना आग लावण्यात आली. या परिसरात रात्रीच्या वेळेस वागळे पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक शेलार आणि त्यांचा सहकारी जाधव हे दोघे गस्त घालीत होते. त्या वेळी दुचाकींना लागलेली आग पाहून त्यांनी परिसरातील नागरिकांना जागे केले आणि त्यानंतर पाणी तसेच झाडांच्या फांद्यांनी आग विझविण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर आगीमध्ये इतर दुचाकी जळू नयेत म्हणून त्या दुसऱ्या ठिकाणी हलविल्या. संतोष गायकवाड, हुसेन शेख, रामप्रसाद यादव आणि विष्णू हल्ली या चौघांच्या दुचाकी जळाल्या. २८ जुलैला पहाटेच्या वेळेस ही घटना घडली होती. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वागळे इस्टेट पोलीसांनी तात्काळ तपास करत या तिघांना अटक केली. या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने ही कारवाई केली.

घटनाक्रम
२७ जुलैला रात्री ११ वाजता जेम्स आणि त्याची प्रेयसी नेहरूननगर परिसरात बोलत होते. त्या वेळी याच भागात राहणारे हुसेन शेखचा भाऊ टिपू याने जेम्सला हटकले. या कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले. या दोघांचे यापूर्वी काही कारणावरून वाद झाले होते. या सर्वाचा राग मनात धरून टिपूला धडा शिकविण्यासाठी जेम्स याने प्रकाश आणि राहुलच्या मदतीने दुचाकी जाळण्याचा कट रचला. पहाटेच्या सुमारास दोन दुचाकीवरून नेहरूनगर भागात येऊन तेथील दुचाकींवर पेट्रोल टाकून त्यांना आग लावली. त्यानंतर तिघांनी तेथून पलायन केले.