कल्याण डोंबिवली शहरापासून साधारण पंधरावीस किलोमीटरच्या अंतरावर मलंगगडाच्या पायथ्याशी बांधणवाडी व कोपऱ्याची वाडी आहे. डोंगराच्या कुशीत असलेल्या या वाडय़ा सोयीसुविधांपासून वंचित आहेत. एकीकडे गडावर फ्युनिक्युलर रेल्वेच्या रूपाने पर्यटनाचे केंद्र साकारले असले तरी वाडय़ांच्या गरजांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. स्थानिक आदिवासींच्या समस्या जाणून घेण्यात लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणेला स्वारस्य नसल्याचे जाणवते. येथील ग्रामस्थांना अनेकदा शासनदरबारी आपली कैफियत मांडली, मात्र त्याचा काही एक उपयोग झालेला नाही..

बांधणवाडी व कोपऱ्याची वाडी, तालुका अंबरनाथ

अंबरनाथ तालुक्याच्या सीमेवर मल्लंगगडाच्या पायथ्याशी बांधणवाडी व कोपऱ्याची वाडी आहे. कल्याण डोंबिवलीहून काटई नाक्याला वळसा घालून बदलापूर पाइपलाइन रोडवरील खोणीजवळ तळोजा रस्त्याने, उसाटणे फाटय़ावरून साधारण तीनचार किलोमीटरच्या अंतरावर बांधणवाडी आहे. रस्त्याने जाताना कुठेही बांधणवाडीचा फलक तुम्हाला दिसत नाही, त्यामुळे विचारत विचारत वाडी गाठावी लागते. वाडीत प्रवेश करताना गावठाण परिसरात जिल्हा परिषदेची शाळा लागते. त्यावरून तुम्ही बांधणवाडीत आला याची खुणगाठ पटते. वाडीत शिरल्यावर पक्क्या विटांची दोनतीन घरे तर काही कुडाची घरे नजरेस पडतात. बांधण देवाचे स्थान वाडीत असल्याने तिला बांधणवाडी असे नाव दिले गेले. तसेच वाडीत प्रवेश केल्यानंतर केतकर कुटुंबाचे घर नजरेस पडते. पूर्वीच्या काळात बांधलेला हा वाडा पहाताच जुन्या आठवणी ताज्या होतात. केतकर यांच्या घरासमोरच इरोस खान यांचे घर आहे. माधव केतकर हे श्रीमलंग मंदिरात पुजाऱ्याचे काम पहात आहेत, तसेच इरोस खान हेही येथील दर्गातील काम पहातात. वाडीत साधारण २० घरे आहेत. येथील कातकरी आदिवासी बांधव हे काही केतकर यांच्या घरी कामाला आहेत, तर काही इतर ठिकाणी मजुरीच्या कामासाठी, शेतीच्या कामासाठी जातात. बांधणवाडीत जाण्यासाठी बऱ्यापैकी चांगला रस्ता आहे. चंद्रास केतकर यांनी त्यांच्या मालकीची जागा रस्त्यासाठी देऊ केली आहे. टेलिफोनची कोणतीही सोयीसुविधा येथे नाही. बीएसएनएलची सुविधा गेली दहा वर्षे बंद आहे, रिलायन्स, टाटा या कंपन्यांनी येथे टॉवर उभारण्याविषयी वारंवार पत्रव्यवहार केले, परंतु त्याला यश आले नाही. आता रहिवाशांकडे मोबाइल आल्याने संपर्क  साधण्याच्या अडचणी कमी झाल्या असल्या तरी पावसाळ्यात या सुविधांचाही बोजवारा उडतो. १९९८ ते २००२ पर्यंत केतकर यांच्या घराच्या अंगणातच शाळा भरत होती. त्यानंतर जिल्हा परिषदेला वाडीत जागा देऊन तिसरीपर्यंत शाळा सुरू झाली. वाडीत थोडे पुढे गेले की आठवीपर्यंत शाळा आहे, पुढे ढोका गावात १२ वीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. आरोग्याचा विचार केला तर वाडीमध्येच डॉ. गणेश पाटील राहतात. ते व त्यांच्या पत्नी दोघेही डॉक्टर असल्याने अडचणीच्या वेळी रुग्णांना प्राथमिक उपचार मिळू शकतात.

कोपऱ्याची वाडी

बांधणवाडीपासून दोनएक किलोमिटर अंतरावर मलंगगडाच्या कुशीत वसलेली कोपऱ्याची वाडी आहे. तीस वर्षांपूर्वी जागेवरून वाद झाल्याने काही आदिवासी बांधवांनी बांधणवाडीपासून थोडे पुढे जात गावठाणाची नवी जागा पहात तेथे पक्की घरे बांधली. एका कोपऱ्यात ही वाडी असल्याने तिला कोपऱ्याची वाडी असे नाव पडल्याचे गौरव देऊगिरा यांनी सांगितले. या वाडीत एकूण २६ घरे असून ठाकूर आणि कातकरी समाजाचे लोक राहातात. चारपाच कुडाची घरे सोडली तर तुम्हाला वाडीत इतर घरे पक्क्या विटांच्या बांधलेल्या, रंगरंगोटी केलेल्या दिसतात. ग्रामपंचायतीच्या विविध योजनांमधून वाडीतल्या वाडीत पेव्हर ब्लॉक टाकून पायवाटा बनविण्यात आल्या आहेत. सौर ऊर्जेवर चालणारे दिवेही रस्त्यांच्या दुतर्फा लावलेले आहेत. वाडीत सार्वजनिक शौचालये असून घरोघरीही पंचायत समितीच्या योजनांमधून शौचालये बांधलेली आहेत. वाडीत अंगणवाडी व तिसरीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे.

मोलमजुरी हेच उपजीविकेचे साधन

मोजमजुरी करणे हेच येथील रहिवाशांचे प्रमुख साधन आहे. कुणी वीटभट्टी तर कुणी दगडीखाणींवर कामाला जाते. काहीजण शेजारील गावातील शेतीवर कामाला जातात. सध्या मलंगगडावर विकासकामे सुरू आहेत. या कामांवर जाऊन हे लोक आपली गुजराण करीत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत आसपास असलेल्या डोंगरदऱ्यांमधील आंबे, जांभूळ, करवंदे हा रानमेवा गोळा करतात. वाडीतील महिला व लहान मुले ही फळे मलंगगडाच्या मुख्य रस्त्यावर किंवा उसाटणे फाटा, नाऱ्हेण गाव, मलंगवाडी बाजार येथे विक्रीसाठी येतात. त्यातून त्यांना चार पैसे सुटतात. पावसाळ्यात ओढा नाल्यांना पाणी येते. त्यामुळे येथील पाण्यात मासेमारी करून ती विकण्याचा व्यवसायही महिला करत असल्याचे पिढीबाई कातकरे यांनी सांगितले. ओढय़ाच्या पाण्यावर रानभेंडी, वांगी, भोपळा अशा भाजीपाल्याचेही पीक घेतले जाते. मात्र मोठय़ा प्रमाणात त्याची लागवड किंवा शेती केली जात नाही. आमच्या मालकीची जमीन नाही, वनविभागाकडून जमिनी घेऊन आम्ही त्यावर घरे बांधली. मात्र शेतीसाठी जमीन नसल्याने मजुरी करण्याव्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे येथील तरुण वर्ग सांगतो.

वीज व पाण्याची सुविधा

वाडय़ांमध्ये महावितरणचा ट्रान्सफॉर्मर असून  तेथून वाडीतील घरांना वीजपुरवठा केला गेला आहे. तसेच रस्त्यांवर सौर पथदिवे लावण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून कुपनलिका खोदण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाडीत कधी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत नसल्याचे गावकरी सांगतात.

 रस्त्याचा प्रश्न गंभीर

डोंगराच्या कडेकपारीत घरे तर दिसतात. मात्र तेथे जाण्यासाठी रस्ते नाहीत. खड्डयातून, ओढय़ा नाल्यातून पायवाट मिळेल तसे तुम्हाला कोपऱ्याची वाडी गाठावी लागते. रस्ता आज इथे तर उद्या तिथे अशीच काहीशी येथे परिस्थिती आहे. बांधणवाडीतून कोपऱ्याच्या वाडीत जाण्यासाठी तुम्हाला एक ओढा पार करावा लागतो. पावसाळ्यात या ओढय़ाला पाणी आले तर गावाचा संपर्कच तुटतो. अनेकदा पावसाळ्यात ओढय़ाला जास्त पाणी आल्याने त्या पाण्यात जनावरे वाहून गेली आहेत, तर शिक्षकांनाही घरी जाण्यासाठी रस्ता नसल्याने ते वाडीवरच राहत असल्याच्या आठवणी गावकरी सांगतात. पावसाळ्यात साथीच्या आजारांनी गावकरी हैराण होतात, कधी आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर रुग्णांना रात्री-अपरात्री डोली करून दवाखान्यात उपचारासाठी न्यावे लागत असल्याचे गौरवने सांगितले. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आमदार, खासदार दरबारी प्रश्न मांडले आहेत. मंत्रालयापर्यंतही हा प्रश्न गेला. मात्र लोकप्रतिनिधीच उदासीन असल्याने आमचा हा प्रश्न सुटलेला नाही. आमदार गणपत गायकवाड व खासदार श्रीकांत शिंदे केवळ मत मागण्यापुरते आमच्या वाडीत आले. मात्र निवडणुका झाल्यानंतर एकदाही त्यांची पावले या वाडीकडे वळलेली नाहीत. त्यांच्याकडून दरवेळी देण्यात येणाऱ्या फसव्या आश्वासनांना आता आम्ही वैतागलो असून आमची तिसरी पिढी रस्त्यासाठी संघर्ष करत आहे. आमच्या वाडीला रस्ता मिळावा व ओढय़ावर आम्हाला पूल बांधून द्यावा. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे भुरेश गिरा, भुऱ्या पारधी ही तरुण मंडळी सांगतात.

कोपऱ्याच्या वाडीचा रस्ता हा खासगी जागेत येत असल्याने हा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडला आहे. केतकर कुटुंबाची खासगी मालकीची ही जागा असून सरकारने आत्ताच्या बाजारभावानुसार आम्हाला योग्य मोबदला दिल्यास आम्ही जागा देण्यास तयार असल्याचे केतकर कुटुंबीय सांगत.

दळणवळणाच्या साधनांचा अभाव

बांधणवाडी किंवा कोपऱ्याच्या वाडीत जाण्यासाठी पालिकेची बस किंवा इतर खासगी वाहनांची सुविधा नाही. उसाटणे फाटा किंवा मलंगगडाच्या पायथ्यापर्यंत बसची सुविधा तसेच सहा आसनी रिक्षांचा पर्याय उपलब्ध आहे. त्यापुढे मात्र कोणतेही वाहन जात नाही. यामुळे चार ते पाच किलोमीटरचे अंतर पायी कापावे लागते.