उत्तराखंड येथे गिर्यारोहणासाठी गेलेल्या विरारच्या तरुणाचा हिमवादळात सापडून मृत्यू झाला आहे. सुमित कवळी असे त्याचे नाव आहे. १० एप्रिल रोजी ही दुर्घटना घडली. त्याचा मृतदेह शुक्रवारी विरारच्या आगाशी येथील मूळ गावी आणण्यात येणार आहे. हिमवादळामुळे शरीराचे तापमान गोठून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विरार पश्चिमेच्या आगाशी गावात राहणारा सुमित कवळी (२८) या तरुणाला गिर्यारोहणाची आवड होती. ५ एप्रिलला सुमित आपल्या दोन मित्रांसोबत उत्तराखंडला जाण्यास निघाला होता. ‘युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया’ या गिर्यारोहण संस्थेत उत्तराखंड येथील ‘चैनशील ट्रेक’साठी चार महिने अगोदर ऑनलाइन नोंदणी केली होती. सोबत गिरीभ्रमणासाठी आलेल्या ४० गिर्यारोहकांचे पथक आणि वाटाडे मदतीला होते. त्यांनी पहिला कॅम्प सनौटी (१०,४०० फूट) हे आठ किलोमीटर अंतर पहिल्याच दिवशी सर केले. उत्तराखंड येथील चैनशील ट्रेकचे उच्च शिखर ‘समताटच’ (११,६४७ फूट ) सर केल्यानंतर त्यांना बेसकॅम्पवर परत यायचे होते. ६ तारखेला ‘बालावत’ (६२८३ फूट) या बेसकॅम्पवर त्यांनी हजर झाल्याची नोंद केली. मुख्य ट्रेकला त्यानंतर दोन दिवसांनी सुरुवात झाली होती. १० तारखेला ‘समताटच’ (११,६४७ फूट) या ट्रेकच्या सर्वात उंच कॅम्पला जाताना संध्याकाळी अचानक हिमवादळ सुरू झाले. या वादळामुळे गिर्यारोहकांना मार्ग दिसेनासा झाला आणि ते भरटकले. इतर गिर्यारोहक कॅम्पवर पोहोचण्यात कसेबसे यशस्वी झाले तर सुमित आणि अन्य एक वाटाडय़ा मागे राहिले. हिमवादळामुळे त्याच्या शरीराचे तापमान गोठून तो बेशुद्ध पडला. वाटाडय़ाने त्याला कॅम्पवर आणले मात्र तोपर्यंत त्याचे निधन झाले होते. हायपोथर्मियाने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सुमितचे पार्थिव डेहराडूनला आणण्यात आले असून गुरुवारी त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. शुक्रवारी त्याचा मृतदेह विरार येथील आगाशी येथील मूळ घरी आणण्यात येणार आहे. सुमित पुण्यातील एका कंपनीत कामाला होता. विरार येथील आगाशी हे त्याचे मूळ गाव असून तो सध्या मीरा रोडला राहात होता. तो पुण्याला स्थायिक होणार होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. त्याचे कुटुंबीय मृतदेह घेण्यासाठी उत्तराखंडला रवाना झाले आहेत.