||मयूर ठाकूर

भाईंदर पश्चिमेकडील टपाल कार्यालयात  उंदराचा सुळसुळाट वाढल्याने कामकाज  दोन दिवस बंद ठेवण्याची वेळ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आली.

या परिसरातील हे एकमेव  टपाल कार्यालय आहे. यात रजिस्टर एडी,  स्पीड पोस्ट,  कुरिअर आणि पार्सलसाठी अनेक  ग्राहकांची  रांग लागलेली असते. परंतु कार्यालयात मध्यंतरी उंदरांची संख्या वाढल्याने कार्यालयातील कर्मचारी हैराण झाले. कार्यालयात घुसलेल्या उंदरांनी जागोजागीच्या वीज तारा कुरतडल्या. याशिवाय काही कागदांची कुरतडून चाळण केली. रोज कर्मचारी कार्यालयात आल्यानंतर तेथील काही ना काही नुकसान त्यांच्या नजरेत येत होते. काही दिवसांपूर्वी टपाल कार्यालयात घुसलेल्या उंदरांनी उरलल्यासुरल्या कागदांचा फडशा उडवला आणि इतर सामानाचे नुकसान केले.  त्यामुळे नाइलाजास्तव हे कार्यालय बंद ठेवावे लागले.

टपाल कार्यालयात एकूण  १८ कर्मचारी कार्यरत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार रोज किमान २५० पत्र  कार्यालयातून पोस्ट केली जातात. ‘स्पीड पोस्ट’ चे १७ रुपये, तर रजिस्टर एडीसाठी २२ रुपये आकारले जातात. त्याचप्रमाणे  पोस्ट करत असलेल्या वस्तूच्या  वा पाकिटाच्या वजनाप्रमाणे किंमत आकारण्यात येते. परंतु कार्यालयातील मुख्य संगणकाचीच तार उंदराने कुरतडल्याने त्याचा थेट परिणाम  कामकाजावर व जमा होणाऱ्या महसुलावर होत आहे.

टपाल प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याने टपाल कार्यालयाची दुर्दशा झाली आहे. योग्य निगा, अपुरे मनुष्यबळ  यांसारखी अनेक कारणे  समोर आली आहेत. कार्यालयात वाढत्या  उंदरांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन  खंबीर नसल्याने  पाठवत असलेली   पत्रेही किती  सुखरूप राहत असतील  असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

घडलेल्या संबंधित  घटनेची तक्रार आम्ही वरिष्ठांकडे केली आहे. ही समस्या लवकरच दूर केली जाईल

-रामचंद्र खरपडे, पोस्ट मास्तर